मुंबई : टाटा कर्करोग रुग्णालयात रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चौथ्या टप्प्यातील रक्ताचा कर्करोग (हॉजकिन्स लिम्फोमा) झालेल्या तरुणाला उपचार मिळण्यास विलंब होत होते. यामुळे हतबल झालेल्या नागपूरमधील या तरुणांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची याचना केली. याची दखल घेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने केलेल्या पाठपुराव्यामुळे टाटा रुग्णालयाने अवघ्या दोन महिन्यांत या तरुणावर उपचार केले. या तरुणावर ‘ऑटोलॉगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट’ यशस्वी केल्याने कर्करोगावर मात करण्यात यश आले आहे.
नागपूरमधील रहिवसी असलेला अभियंता तीर्थनकार निरंजन तीर्थनकारला चौथ्या टप्प्याचा रक्ताचा कर्करोग (हॉजकिन्स लिम्फोमा) झाल्याचे निदान झाले. शरीर दिवसेंदिवस अशक्त होत होते, वजन तब्बल २० किलोने कमी झाले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही टाटा रुग्णालयामध्ये उपचार मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे तरुणांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची याचना केली. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना तातडीने टाटा मेमोरियल रुग्णालयाशी संपर्क साधून तातडीने उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली. तत्पूर्वी तीर्थनकारवरील उपचालासाठी एक वर्ष लागणार होते. परंतु मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने केलेल्या पाठपुराव्यामुळे रॉयवर अवघ्या दोन महिन्यांत उपचार करण्यात आले. त्याच्यावर ‘ऑटोलॉगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट’ यशस्वी झाले. वेळेवर उपचार झाल्याने तीर्थनकारच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
अनेकांच्या जगण्याची प्रेरणा
तीर्थनकार प्रत्यारोपणानंतरची पहिली लस घेण्यासाठी २८ मार्च रोजी नागपूरहून मुंबईतील टाटा रुग्णालयामध्ये आला. उपचारानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने बालपणातील सर्व लसी पुन्हा घ्याव्या लागतात. ही प्रक्रिया त्याच्यासाठी संघर्षाच्या आठवणींना उजाळा देणारी ठरली. तीर्थनकार आज समाज माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागृती करीत आहे. कर्करोगाशी लढणाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत बनत आहे.
कक्षप्रमुखांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी उत्सूक
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांचे मनापासून आभार मानतो. उपचारांसाठी सामान्यतः एक वर्ष लागणारी प्रक्रिया त्यांच्या प्रयत्नांमुळे लवकर पार पडली. ज्यामुळे मी चौथ्या टप्प्यात निदान झालेल्या कर्करोगावर मात करू शकलो. प्रत्यारोपणानंतर एका वर्षाने मी लस घेतली आणि नवीन जीवन जगत आहे. हे सर्व नाईक यांच्यामुळे शक्य झाले. मी त्यांचे फोनवरून आभार मानले, पण लवकरच त्यांची भेट घेऊन आभार मानण्यास उत्सुक असल्याचे तीर्थनकारने सांगितले.