मुंबई : तापलेल्या वातावरणामुळे सोमवारी मुंबईकरांना काहिलीचा अनुभव आला. सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या. रेल्वेतील प्रवासही असह्य करणारा होता. रेल्वे फलाट तसेच बस थांब्यावरील छताचा अभाव एरवी फारसा जाणवणारा नसला तरी छत नसलेले बस थांबे सोमवारी जाचक ठरले. दरम्यान असे वातावरण मंगळवार आणि बुधवारीही कायम राहण्याची शक्यता आहे.
शहर आणि उपनगरांत सोमवारी दुपारी सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव आला. कडकडीत ऊन, घामाच्या धारा आणि प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. फेब्रुवारीच्या मध्यापासून मुंबईतील तापमानाचा पारा ३५ अंशापार पोहोचला आहे. उन्हाच्या झळांनी नागरिकांची लाही होत आहे. सोमवारी सकाळपासून उकाडा जाणवत होता. सकाळी दहानंतरच उन्हाची तीव्रता वाढली आणि झळा जाणवू लागल्या. दुपारी घरात आणि बाहेर फिरतानाही उन्हाचा दाह जाणवला. रस्त्यावर फिरताना उन्हाचे चटके बसत होते.
सकाळपासून उन्हाच्या काहिलीने बेजार होणारे नागरिक उसाचा रस, लिंबू सरबत, ताक अशी थंड पेये पिण्यासाठी विक्रेत्यांच्या गाडीवर गर्दी करताना दिसत आहेत. तसेच उन्हाचा तडाखा पाहता नागरिकांनी टोपी, छत्रीचा वापर सुरु केला आहे. याचसोबत दुचाकीवरून फिरताना स्कार्फ, रुमाल बांधून नागरिक फिरत आहेत. दुपारच्या उन्हात शक्यतो घराबाहेर पडणे नागरिक टाळत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यातच तापमान ३७ अंशावर पोहोचल्याने येत्या उन्हाळ्यात तापमान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिक टोपी, गॉगल, स्कार्फ खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी करीत आहेत.
दरम्यान, समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घामाचा त्रास मुंबईकरांना अधिक होतो. घामामुळे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळतात. अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. या कडक उन्हामुळे मुंबईकरांचे आरोग्य देखील बिघडत असून ताप, सर्दी, डोकेदुखी यांखेरीज चोळे कोरडे होणे, पोटदुखी अशा त्रासांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. तसेच उन्हामुळे त्वचा काळी पडणे, डोळ्यांची आग होणे याबरोबरच शरीरात रुक्षता जाणवते.
काय काळजी घ्यावी
आवश्यकता असेल, तरच उन्हात जा.
बाहेर जाताना डोळ्यावर गॉगल लावा.
द्रवपदार्थांचे प्रमाण वाढवा.
तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
उघड्यावरच्या बर्फ घातलेल्या पेयांचे सेवन करु नये.
ताज्या भाज्या, मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा.
शीतपेये अधिक प्रमाणात घेऊ नयेत.
उष्णतेचा त्रास झाल्यास काय करावे
संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे.
शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.
पुरेसे पाणी , ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ द्या.