मुंबईः कांदिवली (प.) येथे रस्ता ओलांडणाऱ्या दोन वृद्ध महिलांना शनिवारी भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर मालाड पश्चिम येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी जखमी महिलेच्या तक्रारीवरून निष्काळजीपणे टेम्पो चालवल्याबद्दल चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली.
या अपघातात भारती सुभाष शहा (७१) यांचा मृत्यू झाला. तर हंसा प्रवीणकुमार घिवाला (७१) जखमी झाल्या. त्याच्या पायाला व कमरेला फ्रॅक्चर झाल्याची माहिती पोलिासांनी दिली. घिवाला या कांदिवलीमधील डहाणूकरवाडी येथे राहतात. हंसा घिवाला यांच्या तक्रारीनुसार, घिवाला काही वस्तू खरेदी करण्यासाठी शनिवारी सायंकाळी घरातून बाहेर पडल्या. कांदिवलीतील येथील एस. व्ही रोड, सेंट्रल बॅक ऑफ इंडियासमोरून घिवाला रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भारती शहाही त्यांच्यासोबत रस्ता ओलांडत होत्या.
बोरिवलीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने घिवाला व शहा या दोघांनाही धडक दिली. टेम्पोची धडक बसताच दोघीही खाली कोसळल्या. नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे चालकाने टेम्पो पुढे काही अंतर थांबवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. दोन्ही जखमी महिलांना रुग्णवाहिकेतून मालाड येथील तुंगा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शहा यांचा मृत्यू झाला. हंसा धिवाला यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या पायाला व कमरेला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी कांदिवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा
या अपघातात जखमी झालेल्या हंसा घिवाला यांचा जबाब कांदिवली पोलिसांनी नोंदवला असून त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टेम्पो चालकालाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), १२५ (ब) व २८१ अंतर्गत निष्काळजीपणे टेम्पो चालवून महिलेच्या मृत्युला कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. जखमी महिलेने अपघातग्रस्त टेम्पोचा क्रमांक पोलिसांना दिला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात टेम्पो चालकाचे नाव इक्बाल शेख असल्याचे समजले. भरधाव वेगाने टेम्पो चालवून एका महिलेचा मृत्यू व दुसरीला जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी कांदिवली पोलीस अपघात स्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी करीत आहेत.