मुंबई : वांद्रे येथील म्हाडा भवनाचा लवकरच कायापालट होणार आहे. म्हाडा भवनाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. भवनाच्या आवारातील पाच ठिकाणी सुशोभिकरण करण्यात येणार असून यासाठी दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या सुशोभिकरणाच्या कामासाठी येत्या एक-दोन दिवसांत निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या सुशोभिकरणात फुलझांडांसह आसन व्यवस्था, सॅण्ड वाॅकिंग, टेबल वाॅकिंग अशा अनेक सोयी कर्मचाऱ्यांसह म्हाडात येणाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.
राज्यभरात घरांची निर्मिती करून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर देण्याची जबाबदारी म्हाडावर आहे. त्यानुसार आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक कुटुंबाचे हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले आहे. म्हाडाचे मुख्यालय वांद्रे, कलानगर येथे आहे. म्हाडा भवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हाडा मुख्यालयाच्या इमारतीची रचना मंत्रालयाच्या वास्तुशी मिळती जुळती आहे. म्हाडा भवन १९७१ मध्ये बांधण्यात आले असून ही इमारत ५० वर्षांहून अधिक जुनी आहे. इमारतीची सातत्याने आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येते. काही वर्षांपूर्वी म्हाडा भवनाच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्याप पुनर्विकास मार्गी लागलेला नाही. आता म्हाडा भवनाचा कायापालट करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच म्हाडा इमारतींची पूर्णत स्वच्छता करण्यात आली होती. तसेच इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली. आता या इमारतीच्या आवराचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. भवनातील पाच ठिकाणांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
उद्यान आणि चालण्यासाठी सुविधा
पाच ठिकाणी फुलझाडे लावण्यात येणार असून छोटे उद्यान तयार केले जाणार आहे. काही ठिकाणी सॅण्ड वाॅकिंग, टेबल वाॅकिंग संकल्पनेनुसार चालण्यासाठीची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी आसन व्यवस्थाही केली जाणार आहे.
दीड कोटी रुपये खर्च
सुशोभिकरणासाठी अंदाजे दीड कोटी रुपये लागणार असून यासंबंधीच्या प्रस्तावास प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता एक ते दोन दिवसात सुशोभिकरणाच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. निविदा अंतिम करत लवकरात लवकर सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून येत्या चार ते पाच महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.