मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ मार्गिकेतील कांजूरमार्ग कारशेडच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) लवकरच सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकतीच एमएमआरडीएने निविदा मागविली आहे. कारशेडच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी येत्या १५ दिवसात निविदा मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कांजूरमार्ग कारशेडच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या १५.३१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे काम एमएमआरडीए करीत आहे. १३ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेली आणि ६६७२ कोटी खर्चांची ही मार्गिका २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. दरम्यान मेट्रो ६ मधील कारशेड कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागेवर प्रस्तावित करण्यात आली असून या जागेला २०१६ मध्ये राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो ३ ची (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरे कॉलनीतून कांजूरमार्गला हलविण्यात आली. त्यानंतर या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला.

हेही वाचा : विधानपरिषदेतील सेना आमदारांविरोधातील याचिका सुनावणीत संदिग्धता; ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा

हा वाद थेट न्यायालयापर्यंत गेला आणि वादात मेट्रो ६ ची कारशेडही रखडले. पण आता मात्र मेट्रो ६ मार्गिकेतील कारशेडच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. राज्य सरकारकडून कारशेडसाठी १५ हेक्टर जागा काही महिन्यांपूर्वीच एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात आली आणि मेट्रो ६ च्या कारशेडच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. कांजूरमार्गची जागा ताब्यात आल्यानंतर तात्काळ कामासाठी निविदा काढली जाईल असे वाटत होते. मात्र ताबा मिळून पाच महिने उलटले तरी निविदा जारी झालेली नाही. पण आता मात्र लवकरच निविदा काढली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष दिल्लीत; कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत

कांजूरमार्ग कारशेडच्या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याकरीता नुकतीच एमएमआरडीएने निविदा जारी केली आहे. आता १५ दिवसांत कारशेडच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण करून नव्या वर्षात कारशेडच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Story img Loader