मुंबई : दहिसर पूर्वेकडे असलेल्या पालिकेच्या मुरबाळी जलतरण तलावाची दुर्दशा झाली असून या तलावाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने शुक्रवारी निदर्शने केली. तलावाच्या दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी आंदोलन केले. दहिसर पूर्वेकडे शुक्ला कपाऊंडमध्ये असलेल्या मुरबाळीदेवी जलतरण तलावाची गेल्या अकरा वर्षातच दुर्दशा झाली आहे. हा तलाव २०१२ मध्ये नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र सध्या या तलावाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय घाडी यांनी सांगितले की जलतरण तलावाच्या प्रवेशद्वारावरील नावाचे फलकही पडले आहेत.
तलावाच्या आजूबाजूच्या लाद्याही उखडल्या आहेत. तलावाच्या आतील भागातील लाद्यांचे अक्षरशः तुकडे पडले असून ते तलावात पोहोण्यासाठी उतरलेल्यांच्या पायाला लागतात. तसेच गेल्या वर्षभरापासून या तलावाची दूरवस्था झाली असून तलावाच्या काठावरील मॅट तुटल्या आहेत. त्यामुळे चालताना पडून अपघात होतात. तसेच काही महिन्यांपूर्वी शॉवर घेत असताना हरीश मकवाना हे सदस्य पाय घसरून पडले व त्यांना डोक्याला आठ टाके पडले. अशा दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असेही घाडी यांनी विचारले. या तलाव परिसरात सदस्यांसाठी असलेले लॉकर तुटले आहेत ते सताड उघडे असतात. शौचालयांमधून दुर्गंधी येत असते. तेथील दिवे बंद पडले आहेत, बसण्यासाठी व्यवस्था नाही.
हेही वाचा : चोरीला गेलेला सुमारे दीड कोटींचा ऐवज प्रवाशांना परत
सभासदांकडून १० टक्के शुल्कवाढ घेतली जाते पण सोयीसुविधा दिल्या जात नाहीत, अशीही माहिती घाडी यांनी दिली. जलतरण तलावाच्या देखभालीसाठी ठेकेदार आहे, पण तो लक्ष देत नाही. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि उपायुक्त किशोर गांधी यांना या तलावाच्या दूरवस्थेबाबत निवेदन दिले आहे व दुरुस्तीची मागणीही केली आहे. मात्र त्यांनी दखल घेतली नाही, असा आरोपही घाडी यांनी केला आहे. या तलावाच्या दुरुस्तीसाठी अद्याप निविदा प्रक्रिया सुरू केलेली नाही.
हेही वाचा : बेस्टच्या वीजग्राहकांना विजेची छापील बिले मिळेना; बेस्टच्या कार्यालयात बिलांचे गठ्ठे पडून
ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दहिसरमधील ठाकरे गटाचे सर्व माजी नगरसेवक सहभागी झाले होते. त्यात ठाकरे गटाच्या प्रवक्ता संजना घाडी तसेच, सुजाता शिंगाडे, संजय घाडी, बालकृष्ण ब्रीद, रिद्धी खुरसुंग, भास्कर खुरसुंगे आदी माजी नगरसेवक सहभागी झाले होते.