कुलदीप घायवट
मुंबई : लोकलमधील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने शून्य मृत्यू मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबई महानगरातील संस्थांना कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेला सर्वप्रथम सकारात्मक प्रतिसाद मुंबईतील मुख्य पोस्ट मास्तर कार्यालयाने दिला. नोव्हेंबर २०२३ मध्ये कामाकाजाच्या वेळा बदलण्याचा निर्णय टपाल कार्यालयाने घेतला. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. टपाल कार्यालयातील ११५ पैकी ६९ अधिकारी, कर्मचारी हे मध्य रेल्वेवरून येत असल्याने, त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केला जाईल. त्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ ठराविक चौकटीतील कामाची वेळ लवकरच बदलणार आहे.
लोकलमधील प्रवाशांचा गर्दीचा भार ठराविक वेळेत अधिक असल्याने, रेल्वे प्रवासात प्रवाशांचा हकनाक जीव जातो. त्यामुळे लोकलमधील गर्दीचे विभाजन आणि रेल्वे प्रवाशांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी मध्य रेल्वेने ‘शून्य मृत्यू’ मोहीम राबवण्यात येत आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये मध्य रेल्वेने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळा बदलून, दोन पाळ्यांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मध्य रेल्वेने मुंबईतील ५०० संस्थांना कार्यालयीन वेळा बदलण्याचे निवेदन पाठवले. यावेळी सर्वप्रथम मुंबईतील टपाल मुख्यालयानेही (जीपीओ) कामकाजाच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा… कन्नमवार नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग १७ वर्षांनी मोकळा!
मुंबई उत्तर विभागात ३६, मुंबई दक्षिण विभागात २७, मुंबई पूर्व विभागात ३६, मुंबई पश्चिम विभागात ४४, मुंबई उत्तर पश्चिम विभागात ३३, मुंबई जीपीओत एक, मुंबई उत्तर पूर्व विभागात ५३, ठाणे विभाग १९९ आणि नवी मुंबई विभागात १३३ टपाल कार्यालये आहेत. अशी मुंबई महानगरात ५६२ टपाल कार्यालये आहेत. या कार्यालयांतील कर्मचारी सकाळी ८ ते दुपारी ४, सकाळी ९ ते सायंकाळी ५, सकाळी १० ते सायंकाळी ६ अशा तीन पाळ्यांमध्ये काम करतात. विविध कामांच्या पूर्वनियोजनासाठी या तीन पाळ्यांमधील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेच्या एक तास आधी येणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केला जाणार नाही, असे टपाल कार्यालयातून सांगण्यात आले.
हेही वाचा… बोरिवलीच्या श्रीकृष्णनगर पुलाला वन विभागाची परवानगी; लवकरच पुढच्या टप्प्याचे काम सुरू होणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगत असलेल्या टपाल कार्यालयात ११५ अधिकारी, कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. ११५ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ६९ कर्मचारी मध्य रेल्वे स्थानकाच्या जवळ राहत असून, मध्य रेल्वेच्या लोकलने प्रवास करतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी टपाल कार्यालयातून हालचाली सुरू झाल्या आहेत. दैनंदिन कामकाज आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देऊन या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केला जात आहे, असे टपाल कार्यालयातून सांगितले आहे.