लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गोरेगावमधील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ मूळ रहिवाशांपैकी ३०० जणांना महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी, तर उर्वरित रहिवाशांना ऑक्टोबमध्ये घरांचा ताबा देण्याची घोषणा म्हाडाच्या मुंबई मंडळाने केली होती. मात्र १ मेच्या मुहूर्तावर म्हाडाला रहिवाशांना घराचा ताबा देता आला नाही. इतकेच नव्हे तर आता रहिवाशांना ऑक्टोबरमध्येही घरांचा ताबा देणे मंडळाला शक्य नसल्याचे समजते. घरांचे काम पूर्ण होण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांना आता दिवाळीनंतरच हक्काच्या घराचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.
सिद्धार्थनगरचा २००८ पासून रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळ मार्गी लावत आहे. विकासकाने अर्धवट सोडलेल्या पुनर्वसित इमारतींचे काम सध्या मंडळ पूर्ण करीत आहे. विकासकाने ६७२ मूळ रहिवाशांसाठीच्या ११ मजली आठ इमारतींचे (१६ विंगसह) ४० टक्के काम केले होते. उर्वरित ६० टक्के काम पूर्ण करण्याची जबाबदारी मंडळावर होती. या कामासाठी निविदा काढून २०२२ मध्ये बांधकामाला सुरुवात करण्यात आली.
हे काम पूर्ण करण्यासाठी मे २०२४ पर्यंतची मुदत आहे. असे असताना मंडळाने ६७२ पैकी ३०० घरांचे काम एप्रिल २०२३ अखेरीस पूर्ण करून महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी घरांचा ताबा रहिवाशांना देण्याचे जाहीर केले होते. उर्वरित घरांचे काम सप्टेंबर अखेरीस पूर्ण करून त्यांचा ताबा २ ऑक्टोबरला देण्यात येईल असेही मंडळाने जाहीर केले होते. पण आता १ मेचा मुहूर्त चुकला असून २ ऑक्टोबरचाही मुहूर्त साधता येणार नसल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
काही दिवसांपूर्वीच मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सिद्धार्थनगरमधील पुनर्वसित इमारतींच्या कामाची पाहणी केली. आठ इमारतींचे काम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या विषयी बोरीकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सध्या ३०० घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, मात्र घरांमधील आणि इमारतीतील अंतर्गत कामे शिल्लक आहेत.
इमारतींना टप्प्याटप्याने निवासी दाखला मिळणे शक्य नाही. त्यामुळे आता ६७२ घरांचे काम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पूर्ण करून एकत्रित ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. आता दिवाळीनंतरच सर्व ६७२ रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान मे २०२४ पर्यंत पुनर्वसित इमारतींच्या कामाच्या पुर्णत्वाची मुदत आहे. मात्र या मुदतीच्या आतच घरांचे काम पूर्ण करून ताबा देण्यात येणार असल्याचा दावाही मंडळाने केला आहे.