मुंबईः मलबार हिल येथे एक महिला साडेतीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग टॅक्सीत विसरली होती. मलबार हिल पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तासाभरात टॅक्सीचालकाचा शोध लावून टॅक्सीतील बॅग परत मिळवली.
रुपा झवेरी या सो्मवारी सायंकाळी मलबार हिल येथून सिक्का नगरला टँक्सीने जात होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ सोन्याच्या दागिन्यांची बँग होती. सिक्कानगरला उतरल्यानंतर त्या दागिन्यांची बँग टँक्सीतच विसरल्या. टॅक्सीतून उतरल्यावर त्यांना बॅग टॅक्सीमध्येच राहिल्याचे लक्षात आले. त्यात बांगड्या, कर्णफुले असे एकूण साडे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. हा प्रकार लक्षात येताच त्या घाबरून गेल्या. त्यांनी मलबार हिल परिसरात टॅक्सीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रवास केलेली टॅक्सी त्यांना दिसली नाही. अखेर त्यांनी जवळच्याच मलबार हिल पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्याअनुषंगाने मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यातील सायबर पथकाला बोलावून त्याबाबत तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार सायबर पथकाचे अधिकारी सागर शिंदे व ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक आंधळे आणि धारवाडकर यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करून टॅक्सीचा क्रमांक मिळवला. त्या क्रमांकाच्या माध्यमातून टॅक्सीच्या मूळ मालकाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्याने तात्काळ त्याच्या चालकाला दूरध्वनी करून टॅक्सीत विसरलेल्या बॅगेबाबतची माहिती दिली.
हेही वाचा – पश्चिम महाराष्ट्रात १४४ गावांना दरडींचा धोका; सर्वाधिक संख्या कोल्हापूर जिल्ह्यात
हेही वाचा – राज्यात पावसाचा आजपासून पुन्हा जोर
टॅक्सीचालकानेही तात्काळ महिलेची बॅग परत केली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तासाभरात महिलेला तिची बॅग मिळाली. महिलेने या तत्परतेबद्दल पोलिसांचे आभार मानले.