मुंबई : पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने कुर्ला परिसरातून अटक केली. अटक आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश असून याप्रकरणी कुर्ला पोलीस अधिक तपास करीत आहेत.
एक टोळी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून काही अल्पवयीन मुलींना मुंबईत देहविक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ५ च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गुरुवारी कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचला होता. मिळालेल्या वर्णनाच्या दोन महिला तेथे आल्या. त्यांच्यासोबत अन्य एक इसम आणि दोन अल्पवयीन मुली होत्या. पोलिसांनी तत्काळ या सर्वांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींची सुटका करून तिन्ही आरोपीना अटक केली.