मुंबईः बँकॉक गांजा तस्करीचे केंद्र बनत असून सीमशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकत्याच केलेल्या कारवाईत तीन किलो गांजासह एका आरोपीला अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या हायड्रोपोनिक गांजाची किंमत तीन कोटी रुपये आहे. बँकॉकहून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी केली जात असून गेल्या दोन महिन्यात मुंबई विमानतळावरून ७५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

विमानतळावर कारवाई

बँकॉकहून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशीत प्रवाशाला सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी थांबवले. त्याची झडती घेण्यात आली. त्यांच्या बँगेत तीन किलो उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजाचा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत तीन कोटी रुपये आहे. मॅगी, बूट आणि चॉकलेटच्या काही वेष्टनात गांजा लपवण्यात आला होता. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने प्रवासी मोहम्मद शरीफला अटक केली. तो मूळचा केरळमधील रहिवासी आहे. तो मालमत्तांच्या दलालीचे काम करतो. या कामसीठी त्याला २० हजार रुपये मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असून त्याबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपास करीत आहे.

एकाच कारवाईत ५६ कोटींचा गांजा जप्त

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात एकाच कारवाईत पाच प्रवाशांकडून उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला होता. त्यांच्या बॅगेच्या तपासणीदरम्यान ५६ किलो २६० ग्रॅम उच्च प्रतीचा हायड्रोपॉनिक गांजा सापडला होता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत ५६ कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. आरोपीनी हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गांजा लपवला होता.

पर्यटनाच्या नावाखाली गांजा तस्करी

दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात या गांजाची निर्मिती केली जाते. त्यानंतर विविध मार्गांनी त्याचे जगभरात वितरण होते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉकमार्ग मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात विमानांची ये – जा असते. परिणामी, बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये बँकॉकहून तस्कारी करण्यात आलेल्या ७५ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या तस्करीत भारतीय तस्करांचाच सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.