मुंबई : रेल्वेगाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांची जबाबदारी सुरक्षा विभागाच्या खांद्यावर असते. मात्र मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागात १९ हजार ४०० पदे रिक्त आहेत. रनिंग स्टाफ, गँगमन, पॉईंटमन, गेटमन आदी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे काही वेळा कर्मचाऱ्यांकडून नकळत चूका होतात. परिणामी, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भिती रेल्वे कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेवर एक दिवसआड लहान-मोठे तांत्रिक बिघाड, होणारे अपघात यामुळे प्रवाशांना वेठीस धरले जाते. तसेच दुरुस्तीच्या कामांचा वेग मंदावत असल्याने त्याचाही फटका प्रवाशांना बसतो. मध्य रेल्वेकडून ब्लाॅक घेऊन देखभाल-दुरूस्तीची कामे केली जातात, मात्र ही कामे करण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांऐवजी राज्यातील ठिकठिकाणांहून किंवा परराज्यातून कर्मचारी आणले जातात. रेल्वेचे स्लीपर बदलण्याचे काम त्यांच्याकडून करून घेतले जाते. हे कर्मचारी कितपत कुशलतेने काम करतात हा मोठा प्रश्न आहे. तरीही ट्रॅकमन, की-मन, पॉईंटमन ही पदे भरण्यासाठी दिरंगाई करण्यात येत आहे.

हेही वाचा : मुंबई : ‘मास्टर लिस्ट’वरील रहिवाशांसाठी आता ॲानलाइन सोडत!

रेल्वेच्या सुरक्षा पदावर पूर्ण वेळ कार्यरत कर्मचारी असणे आवश्यक आहे. मध्य रेल्वेमध्ये सुरक्षा विभागात एकूण २७ हजार पदे मंजूर असून त्यापैकी १९ हजार ४०० पदे रिक्त असल्याची माहिती नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी दिली. तसेच रेल्वेचे खासगीकरण करून रेल्वे विभागातील अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे, प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो, असे नायर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai total 19400 posts vacant at security department of central railway mumbai print news css
Show comments