मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून पूर्णतः बंद केला जाणार आहे. या पुलावरून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंदी घातली जाणार आहे. त्यानंतर हा उड्डाणपूल पाडण्यात येणार असून वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा शीव स्थानकावरील उड्डाणपूल बंद झाल्याने, मुंबईतील रस्ते वाहतुकीचे तीनतेरा वाजण्याची शक्यता आहे.
ब्रिटिशकालीन ११२ वर्षाचा शीव उड्डाणपूल जीर्ण झाल्याने तो पाडण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात सुरक्षेच्या कारणास्तव या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली. आता हा पूल सर्व वाहनांसाठी बंद केला जाणार आहे. १ ऑगस्टपासून पुलावरील वाहतूक बंद करून जुलै २०२६ पर्यंत या दोन वर्षाच्या कालावधीत नवीन पुलाची बांधणी पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
शीव उड्डाणपूल हा मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कुर्ला दरम्यानच्या प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने तो पाडून त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. सध्या पुलाच्या दोन्ही बाजूला साधारण १० ते १५ फूट उंच पत्रे लावण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांना जाण्यासाठी पायवाट ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा: झोपु योजना संलग्न करण्याच्या निर्णयाचे प्राधिकरणाकडून समर्थन! अनेक झोपु योजनांची मंजुरी रखडली!
मध्य रेल्वे, मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने शीव रेल्वे स्थानकाजवळ जुन्या रेल्वे पुलाच्या जागी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. प्रस्तावित नवीन उड्डाणपूल हा ‘सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स (२)’ ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा आहे. त्यासाठी साधारण २३ कोटी रुपये मध्य रेल्वे आणि २६ कोटी रुपये महापालिका उचलणार आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबईने (आयआयटी) त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये शीव उड्डाणपूल पाडण्याची आणि त्याजागी स्टील गर्डर आणि आरसीसी स्लॅबसह नवीन उड्डाणपूल बांधण्याची शिफारस केली आहे.