मुंबई : पर्यावरणाची सुरक्षा आणि संवर्धन यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची (सीएसएमटी) ‘ग्रीन स्थानक’ अशी ओळख बनली आहे. मात्र त्याच टर्मिनसवरील झाडे तोडून सिमेंटचे जंगल उभे राहत आहेत. सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी झाडे तोडण्यात येत असून, स्थानक परिसर उजाड होऊ लागले आहे. सद्यस्थितीत सीएसएमटीवरून दररोज सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या, गर्दीचे विभाजन करता यावे, तसेच विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकात सुविधा उपलब्ध करण्यासाठी सीएसएमटीचा पुनर्विकास केला जात आहे.
स्थानकाचा ऐतिहासिक वारसा जपून विकासाची सर्व कामे केली जाणार आहेत. ही कामे रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (आरएलडीए) माध्यमातून करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाचे कंत्राट मे. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स (इंडिया) लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण २,४५० कोटी रुपयांची खर्च अपेक्षित असून साधारण पुढील तीन ते चार वर्षांत पुनर्विकसाचे काम पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १८ जवळील संपूर्ण परिसरात पत्र्यांचे उंच कुंपण उभारण्यात आले आहे. तर, या कामाआड येणारी झाडे तोडण्यात येत आहेत. त्यामुळे येथील पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : धूलीवंदनानंतर शीव उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू होणार
या परिसरातील झाडांना नोव्हेंबर २०२३ मध्ये क्रमांक देऊन त्यांची छाटणी करण्याचे नियोजित केले. सीएसएमटीचा प्रस्तावित पुनर्विकास आणि अभियांत्रिकी आणि बांधकामावर पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या कामात २६६ झाडे अडथळा बनली आहेत. यापैकी ८६ झाडे कापण्यात येणार आहेत. तर, १८० झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत, अशी नोटीस मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयाने जानेवारी २०२४ रोजी लावली होती. गेल्या काही कालाधीत ८६ पैकी ३० झाडे कापली गेली असून १८६ पैकी १९ झाडे पुनर्रोपित करण्यात आली आहेत. पुनर्विकासाच्या आड येणारी ‘हेरिटेज गल्ली क्रमांक १’ मधील झाडे तोडली जाणार असून, येथील ब्रिटिशकालीन वाफेवर चालणारी क्रेन, स्टोन क्रशर यंत्र, पहिले इलेक्ट्रिक इंजिन, हॅण्ड ट्यूब फायर इंजिन, काँक्रिट मिक्सर, प्रिंटिंग प्रेस, कर्नाक बंदरच्या जुन्या विटा इतरत्र स्थलांतरित केल्या जाणार आहेत.