मुंबई : परीक्षेसंबंधित विविध गोंधळांमुळे मन:स्ताप सहन करणारे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी सध्या पाण्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहेत. कलिना संकुलाजवळ असणाऱ्या सांस्कृतिक भवनात पाण्याचा तुटवडा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रेही बंद आणि प्रसाधनगृहांसह इतर ठिकाणी अस्वच्छता असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तर इमारतीत डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे धुळीच्या साम्राज्याने विद्यार्थी त्रस्त आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : तळोजा कारागृहातून अन्य कारागृहात हलवू नका, अबू सालेमची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली

कलिना संकुलाजवळ असणाऱ्या सांस्कृतिक भवनाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर नाट्यशास्त्र विभाग, दुसऱ्या मजल्यावर संगीत विभाग, तिसऱ्या मजल्यावर लोककला अकादमी आणि चौथ्या मजल्यावर शाहीर अमरशेख अध्यासन केंद्र आहे. मात्र, बाहेरून प्रशस्त व चकचकीत दिसणारी ही इमारत आतून विविध सोयी-सुविधांपासून वंचित आहे. कलेचे धडे गिरवण्यासाठी सांस्कृतिक भवनात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या तुटवड्यामुळे हाल सोसावे लागत असून बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रेही बंद आहेत आणि प्रसाधनगृहांमध्ये हात धुण्यासाठीही पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकदा टँकरने पाणीपुरवठा केला जातो, मात्र टँकरचे पाणीही अपुरे पडते. तसेच, सांस्कृतिक भवनाच्या इमारतीत डागडुजीचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे सर्वत्र धूळ व मातीचे साम्राज्य पसरून विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. प्रसाधनगृहांमध्येही अस्वच्छता असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : जलवहन क्षमतेत पुन्हा वाढ? अंधेरी सबवे नाल्याचे नव्याने काम होणार असल्याने खर्चवाढीची शक्यता

सांस्कृतिक भवनातील गैरसोयींबाबत अद्याप कोणत्याही विद्यार्थ्याने तक्रार केलेली नाही. काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित विभाग व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, प्रशासनाकडून तात्काळ सुधारणा करण्यात येईल. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.

डॉ. बळीराम गायकवाड, कुलसचिव, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai university water shortage at cultural building students suffer mumbai print news css