मुंबई : सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले असून त्यासाठी रुग्णालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यांवरील शस्त्रक्रियागृह बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येत आहेत, तर काही रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अन्य रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येत आहे. एकूणच परिस्थितीत या रुग्णांचे हाल होत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी व्ही. एन. देसाई रुग्णलयाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तिसऱ्या मजल्यावर मज्जातंतू विभाग आणि अस्थिव्यंग विभागाचे शस्त्राक्रियागृह, तसेच दुसऱ्या मजल्यावर नेत्र विभाग, कान, नाक, घसा विभागाचे शस्त्रक्रियागृह आहे. या मजल्यांच्या नुतनीकरणाला सुरुवात झाल्यापासून हे शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. या विभागांचे शस्त्रक्रियागृह बंद ठेवल्याने रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात येत नाहीत. परिणामी, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असले तरी शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला महिनाभरानंतरची तारीख दिली जात आहे. तसेच काही रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी केईएम, कूपर, नायर या रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येत आहे. यामुळे मागील दीड ते दोन महिन्यांपासून शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व्ही. एन.देसाई रुग्णालयात उपचार सुरू केल्यानंतर रुग्णांना अन्य रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी जावे लागल्यानंतर त्यांना पुन्हा सर्व प्रक्रिया करावी लागत आहे, असे काही रुग्णांनी सांगितले. यामुळे वेळ व पैसा वाया जात असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : मुंबई : सीएसएमटी फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम फेब्रुवारीत पूर्ण होणार
रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच ते सुरू करण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे व्ही. एन. देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराज आचार्य यांनी सांगितले.