मुंबई : गेल्या आठवड्यात अमर महल जंक्शन येथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असताना १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागल्याने गळती सुरु झाली होती. परिणामी, शहर आणि पूर्व उपनगरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.

कंत्राटदाराच्या कामातील हलगर्जीपणामुळे दुरुस्तीदरम्यान महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तसेच, मनस्तापही सहन करावा लागला होता. त्यामुळे महापालिकेने संपूर्ण नुकसानाचा आढावा घेऊन वाया गेलेले पाणी, दुरुस्ती खर्च आणि दंड आदी मिळून तब्बल ८३ लाखांचा दंड कंत्राटदाराला ठोठावला आला. संबंधित कंत्राटदाराला दंड भरण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती महापालिकेने मेट्रो प्रशासनाकडे केली आहे.

अमर महल जंक्शन येथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असताना १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागल्याने मोठी गळती सुरु झाली होती. संबंधित ठिकाणी मेट्रो प्रकल्पांतर्गत खांब उभे करण्याचे (पायलिंग) काम सुरु होते. या कामासाठी खोदकाम करताना कंत्राटदाराने आवश्यक खबरदारी न घेतल्याने शनिवारी सकाळी जलवाहिनीला गळती लागली होती.

महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागातील कामगार, कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित जलवाहिनीचे दुरुस्तीकाम हाती घेतले होते. या दुरुस्ती कालावधीत पालिकेच्या एम पश्चिम, एम पूर्व, एन, एल, एफ उत्तर, एफ दक्षिण आदी परिसरातील पाणीपुरवठा चोवीस तास बंद ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या जलअभियंता विभागातील सुमारे ५० ते ६० कामगारांचा चमू दुरुस्तीसाठी घटनास्थळी तैनात होता. महापालिकेने प्रयत्नांची पराकाष्टा करून दिलेल्या वेळेपूर्वीच जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण केली.

मात्र, कंत्राटदाराच्या चुकीमुळे महापालिकेला या प्रकरणात मनस्ताप सहन करावा लागला होता. तसेच, पालिका प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. पाण्याचे नुकसान, दुरुस्ती खर्च आणि दंड आदी मिळून एकूण ८३ लाख ५८ हजार रुपयांचा दंड कंत्राटदाराला ठोठावण्यात आला असून याबाबत मेट्रो प्रशासनालाही पत्र पाठविण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदाराला दंडाची रक्कम भरण्यास सांगावे, अशी विनंती महापालिकेने मेट्रो प्रशासनाकडे केली आहे.

जलवाहिनी फुटल्यामुळे गोवंडी- मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, शीव, चुनाभट्टी, टिळक नगर, लालबाग, शिवडी, वडाळा, माटुंगा, दादर मधील अनेक भागांतील पाणीपुरवठा महापालिकेमार्फत बंद करण्यात आला होता. परिणामी, नागरिकांची गैरसोय झाली होती. रुग्णालये, सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांना देखील पाण्याअभावी हाल सोसावे लागले होते.