मुंबई : गेल्या आठवड्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी हिंदमाता परिसरातही पाणी साचल्यामुळे महापालिकेवर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. हिंदमाता परिसरात भूमिगत टाकी बांधण्यात आली असताना येथे पाणी साचल्यामुळे महापालिका प्रशासनालाही कोडे पडले आहे. त्यामुळे ताशी ५५ मीमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास या परिसरात पाणी भरणारच हे सिद्ध झाले आहे.
गेल्या आठवड्यात बुधवार, २५ सप्टेंबर रोजी मुंबईत संध्याकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेमार्गांवर पाणी साचले आणि मध्य व हार्बर मार्ग ठप्प झाले. यामागची कारणे शोधण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. रेल्वे मार्गावर पाणी साचण्याबरोबरच हिंदमाता परिसरीह जलमय झाल्यामुळे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागावर टीका होऊ लागली आहे. यंदा पावसाळ्यात हिंदमाता परिसरात तीन – चार वेळा पाणी साचले. त्यामुळे हिंदमाता येथील भूमिगत टाक्यांचा प्रयोग फसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पर्जन्यजलवाहिन्या विभाग सध्या या फसलेल्या प्रयोगाची कारणे शोधत आहे. या ठिकाणी ताशी ५५ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला, तर पाणी साचणारच असा निष्कर्ष पालिका यंत्रणेने काढला आहे. त्यामुळे यापुढे मुंबईत कोणत्याही ठिकाणी भूमिगत टाकीचा प्रयोग करताना या अनुभवाच्या आधारेच नियोजन करावे लागणार असल्याचा साक्षात्कारही पर्जन्य जलवाहिन्या विभागाला झाला आहे.
हेही वाचा : मुंबई : जोरदार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था, जलमय भागातील खडी वाहून गेल्याने पुन्हा खड्डे
मुंबई बुधवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. कुर्ला, मानखुर्द, चेंबूर – शेल कॉलनी, विक्रोळी, दादर टीटी, अंधेरी सबवे, मानखुर्द, वडाळा, वांद्रे, मालाड, कांदिवली, लालबाग -परळ, गोरेगाव, टिळक नगर, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, विद्याविहार आदी भागांत पाणी साचले. पण हिंदमाता येथील पाणी साचल्याची बाब पालिकेच्या यंत्रणेने विशेष गांभीर्याने घेतली आहे.
परळ परिसरातील हिंदमाता भागाची पाणी तुंबण्यापासून सुटका व्हावी म्हणून पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून येथे पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रयोग केला होता. गेल्यावर्षी या परिसरात पाणी तुंबले नव्हते. त्यामुळे पालिकेने स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. यंदा मात्र पहिल्या पावसात हिंदमाता परिसरात पाणी साचले होते. तसेच सप्टेंबरअखेरीस पडलेल्या परतीच्या पावसातही हिंदमाता परिसर पाण्याखाली गेला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा : उत्सवमहिमा… गंधभारल्या फुलबाजाराला महागाईचा रंग
दरम्यान, हिंदमाता परिसरातील भूमिगत टाक्यांची क्षमता ताशी ५५ मिमी पावसाचे पाणी साठवू शकेल एवढीच असून त्यापेक्षा जास्त पाऊस पडला तर पाणी साचू शकते. पण त्याचा लवकर निचरा होईल, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे यापुढे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रकल्पांची क्षमता पडताळून नव्याने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अंधेरी सब-वे येथील भूमीगत टाकीच्या प्रकल्पासाठी पुन्हा नियोजन करून त्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.