मुंबईः पश्चिम द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ४७ वर्षीय कार चालकाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीने दुभाजक ओलांडून पलीकडून येणाऱ्या खासगी बसला धडक दिली. त्यात बसचेही नुकसान झाले. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी मृत चालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. बोरीवली येथील मागाठाणे पुलावर हा भीषण अपघात झाला. दहिसरवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मोटरगाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती दुभाजकाला धडकली. पण गाडीचा वेग अधिक असल्यामुळे ती दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली केली. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसला मोटरगाडीने उजव्या बाजून धडक दिली. त्यावेळी बस चालकाचेही स्टेअरिंग जॅम झाले. बसही दुभाजकावर चढली. तिचे टायर फाटल्यामुळे मोठा आवाज झाला. सुदैवाने बहुसंख्य प्रवासी बसमधून पूर्वीची उतरले होते. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये चालक, क्लीनर व एक प्रवासी होता. अपघातानंतर मोटरगाडी बाजूला पडली होती. त्यात चालक अडकला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अग्निशमन दलाच्या मदतीने चालकाला बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोेषित केले. पोलिसांनी मोटरगाडीतील चालकाच्या नातेवाईकांना बोलावले असता मृत चालकाचे नाव अमित सुरेश अग्रवाल (४७) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते बोरीवली येथील उच्चभ्रू इमारतीतील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी खासगी बसमधील प्रवासी अनिल गुरव (३२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निष्काळजीपणे मोटरगाडी चालवल्याप्रकरणी अमित अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार गुरव हे मालाड येथील रहिवासी असून रत्नागिरी येथील गावावरून खासगी बसने घरी येत असताना हा अपघात घडला. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने अधिक तपास करत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai western expressway car crosses divider crashes into bus car driver died on the spot mumbai print news css