मुंबई : पश्चिम रेल्वेने एप्रिल – सप्टेंबर २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी मोहिमेतून १२.६३ लाख विनातिकिट प्रवाशांना पकडून ८१.१८ कोटी रुपये दंड वसूल केला. मुंबई सेंट्रल विभागातून वसूल केलेल्या २०.७४ कोटी रुपये दंडाचा त्यात समावेश आहे. मुंबई उपनगरीय लोकल, मेल / एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर आणि हॉलिडे विशेष रेल्वेगाड्यांमधून तिकीट नसलेल्या / अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील सर्व तिकीटधारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली अनुभवी तिकीट तपासणी पथकाद्वारे एप्रिल – सप्टेंबर २०२३ या कालावधीत तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान पश्चिम रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून ८१.१८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मुंबई सेंट्रल विभागात चार लाख विनातिकीट प्रवाशांना पकडून २०.७४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी केली असता, विनातिकीट प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा : मुलाच्या मानेतून काढली दीड किलोची गाठ, शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी केली तब्बल सहा तास यशस्वी शस्त्रक्रिया

सप्टेंबर २०२३ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह १.६४ लाख विनातिकीट/अनियमित प्रवाशांचा शोध घेऊन ९.५० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. याव्यतिरिक्त सप्टेंबर महिन्यात पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ५३ हजारांहून अधिक प्रकरणे शोधून काढल्यानंतर २.३४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. वातानुकूलित लोकलमधून अनधिकृतपणे प्रवास रोखण्यासाठी नियमित तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. एप्रिल – सप्टेंबर २००३ या कालावधीत ३८ हजारांहून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला. यातून १२६.१३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तो १४० टक्के अधिक आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.