मुंबईः अश्लील ध्वनीचित्रफीतीद्वारे ४१ वर्षीय महिलेकडून १० लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने महिलेचे छायाचित्र व ध्वनीचित्रफीत फेसबुकवरून ग्रुपमध्ये शेअर केल्याचा आरोप आहे. महिलेच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपीविरोधात खंडणी, बलात्कार व बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पीडित महिला खासगी कंपनीत नोकरी करीत असून ती शीव परिसरात राहते. तक्रारीनुसार, पीडित महिलेची २०२३ मध्ये आरोपीसोबत ओळख झाली होती. खासगी टॅक्सीतून प्रवास करत असताना १६ फेब्रुवारी, २०२३ रोजी दोघांमध्ये मेत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. त्यानंतर २३ मार्च, २०२३ रोजी आरोपीने पीडित महिलेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने पीडित महिलेला फळांचा रस देऊन अत्याचार केला. ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या हद्दीतील एका इमारतीत हा प्रकार घडला. त्यावेळी आरोपीने पीडित महिलेचे अश्लील छायाचित्र व चित्रीकरण केले. त्यानंतर आरोपीने वारंवार पीडित महिलेवर अत्याचार केला. तसेच मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेकडून १० लाख रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेचे अश्लील छायाचित्र व ध्वनीचित्रफीत फेसबुकवरील काही अश्लील ग्रुपवर शेअर केले. हा प्रकार पीडित महिलेला समजल्यानंतर तिने याप्रकरणी वरळी पोलिसांकडे तक्रार केली.
वरळीतून गुन्हा वर्ग
वरळी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२), ३५१ (२), ३५६ (२), ६४, ६४ (२) (एम) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पण हा गुन्हा ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या हद्दीत घडला असून हे प्रकरण ना. म. जोशी मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
महिलांविरोधातील गुन्ह्यांत वाढ
मुंबई पोलिसांच्याआकडेवारीनुसार, २०२४ मध्ये मुंबईत १०५१ बलात्काराच्या घटना घडल्या, तर २०२३ मध्ये ९७३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. गंभीर बाब म्हणजे परिचित व्यक्तीकडून झालेल्या बलात्काराच्या घटनेत गुन्ह्याची उकल होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांवर घटले आहे. याशिवाय विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येही गेल्यावर्षी वाढ झाली आहे. शहरात २०२३ मध्ये २०५५ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यात २०२४ मध्ये वाढ होऊन २३९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दरम्यान, २०२३ व २०२४ मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्यांत आरोपी अटक होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. शहरातील महिला व अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्येही वाढ झाली असून मुंबईत २०२३ मध्ये महिला व अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११६७ गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये १२३१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एकूणच अल्पवयीन मुलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे.