मुंबई: जुन्या नोटांच्या बदल्यात मोठी रक्कम मिळेल याबाबतची इन्स्टाग्रामवरील जाहिरात भांडूपमधील महिलेला भलतीच महागात पडली. आरोपींनी २० व ५ रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात २५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला भांडूप येथील रहिवासी असून त्या मुलुंडमध्ये कामाला आहेत. त्यांच्या मुलाने ४ एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवर एक जाहिरात पाहिली होती. त्यात तुमच्या जुन्या नोटांच्या बदल्यात किमतीपेक्षा अधिक रक्कम देण्यात येईल, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे तक्रारदार महिलेच्या मुलाने जाहिरातीलमध्ये देण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने जुन्या नोटांचे छायाचित्र व्हॉट्स ॲपवर पाठवण्यास सांगितले. त्या व्यक्तीने नोटांचे छायाचित्र पाहून त्याबदल्यात २५ लाख रुपये मिळतील, असे सांगितले. पण एक करार करावा लागेल, त्यासाठी १२५० रुपये भरावे लागतील, असे त्या व्यक्तीने सांगितले.
हेही वाचा : उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
मुलाने तात्काळ याबाबत आईला सांगितले. त्यानंतर महिलने ६ एप्रिल रोजी त्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे १२५० रुपये आरोपींना पाठवले. हा संपूर्ण व्यवहार करण्यासाठी जीएसटी भरावा लागेल, ही रक्कम आगाऊ भरावी लागेल, असे आरोपींनी सांगितले. त्यानुसार महिलेने सुरूवातीला ६ हजार रुपये भरले. पण त्यानंतर पुन्हा त्यांना ९ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. सुरक्षा निधीपोटी रक्कम भरण्याची सूचना करण्यात आली. हे सर्व झाल्यानंतर त्यांचे २५ लाख रुपये विमानतळावर आले. तेव्हा विमानतळ पोलिसांच्या नावाने दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने विमानतळ पोलिसांच्या नावाने आणखी रक्कम काढून घेतली. अशा प्रकारे विविध कारणे देऊन आरोपींनी तक्रारदार महिलेकडून दोन लाख ८१ हजार ७४९ रुपये उकळले.
हेही वाचा : मुंबई : प्रसाधनगृहात महिलेवर अतिप्रसंग; तरुणाला अटक
महिलेने ही रक्कम आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यात जमा केली. पण त्यानंतरही २५ लाख रुपये न मिळाल्याने अखेर तक्रारदार महिलेने याप्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी महिलेच्या बँकेशी संपर्क साधून फसवणूक झालेल्या सर्व व्यवहारांची माहिती मागवली आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी तीन मोबाइल क्रमांकांवरून महिलेशी संपर्क साधून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.