मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे मार्गिका प्रचंड गुंतागुंतीची, तीव्र वळणाची आहे. त्यामुळे या मार्गावरून लोकल चालवणे फारच जिकिरीचे काम आहे. यामुळे मोटरमन प्रचंड तणावाखाली असून, मोटरमनचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच मोटरमनच्या जवळपास ३० टक्के जागा रिक्त असल्याने, उर्वरित मोटरमनवर कामाचा ताण वाढला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मंजूर १,०७६ पदांपैकी ३१३ मोटरमन पदे रिक्त आहेत. तर, फक्त ७६३ मोटरमन कार्यरत आहेत. मोटरमनची जवळपास ३० टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे केवळ मोटरमन तणावाखाली नसून याचा परिणाम दैनंदिन लोकल फेऱ्यांवर होत आहे. मध्य रेल्वेवर दररोज १,८०१ लोकल फेऱ्या धावत आहेत. कामाचे तास वाढल्याने मोटरमनला येणारा थकवा आणि संभाव्य अपघात वेळीच रोखणे आवश्यक आहे. तसेच मोटरमनची रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचे बोस यांनी सांगितले. तब्बल ३१३ मोटरमनची पदे रिक्त असल्याने, लोकल फेऱ्या चालवण्यासाठी इतर मोटरमनला जादा तास काम करावे लागत आहे.
हेही वाचा : गोष्ट मुंबईची – भाग १४७ : आरे परिसरातच का सापडतात पुरातत्त्वीय पुरावे?
काही दिवसांपासून मोटरमन मुरधीधर शर्मा यांचा कामाच्या तणावामुळे रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचा दावा रेल्वे कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला होता. जादा तास काम केल्याने मोटरमन शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या खचून जातो. तसेच मोटरमनच्या कमतरतेमुळे हक्क्याच्या सुट्ट्या घेताना अडचणी येत आहेत. कुटुंबियाकडे दुर्लक्ष झाल्याने कौटुंबिक वातावरण बिघडत आहे, असे काही मोटरमनकडून सांगण्यात आले.
रिक्त जागांमुळे इतर मोटरमनच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अवेळी जेवण, कुटुंबियांना वेळ न देता येणे, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रजा घेणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : आता सुधारित निवृत्तिवेतन; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना लाभ
मध्य रेल्वेकडून मोटरमनसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा उत्तम आहेत. मात्र जादा कामांच्या तासांमुळे अवघड होते. तसेच रिक्त पदे असल्याने, इतर मोटरमनवर जादा काम करण्याचा भार पडतो. त्यात अनेक लोकलचे मोटरमन लांबपल्ल्यांच्या गाड्या चालवण्यासाठी लोको पायलट म्हणून, लोको पायलट मेन, घाट लोको पायलटसाठी गेले आहेत. त्यामुळे मोटरमनची पदे रिक्त झाली आहेत, असे एका मोटरमनने सांगितले.
भरती प्रक्रिया रखडत सुरू असल्याने, मोटरमनसह अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. कर्मचारी वर्गाचा कामाचा ताण वाढला आहे. तसेच कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केल्याने, भरीव कामगिरी होत नाही. परिणामी, दररोज तांत्रिक बिघाड होतात. मोटरमन भरती प्रक्रिया सुरू असली तरीही साधारणपणे दोन वर्षांनी नवीन मोटरमन रूजू होण्याची शक्यता आहे, असे रेल्वे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.