मुंबई : जन्मजात ‘हिर्शस्प्रंग’ आजाराने ग्रस्त दोन वर्षांच्या बाळावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयामध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. हिर्शस्प्रंगमध्ये मोठ्या आतड्याच्या काही भागांमध्ये मज्जातंतू पेशी तयार न झाल्याने आतड्याची योग्य हालचाल होत नाही. परिणामी मल बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. यावर पीईआर-रेक्टल एंडोस्कोपिक मायोटॉमी या दुर्मिळ प्रक्रियेद्वारे बाळावर केलेल्या उपचारामुळे तो निरोगी जीवन जगू लागला आहे. जागतिक स्तरावर अशा प्रकारच्या केवळ १३ प्रक्रिया झाल्या असून, मुंबईमध्ये हा पहिलाच प्रकार आहे.
नेमका काय त्रास?
नाशिक येथे राहणाऱ्या वैद्य (नाव बदलले आहे) दाम्पत्याला झालेल्या पहिल्या अपत्यामुळे दोघेही खूप आनंदी होते. आर्यन (नाव बदलले आहे) एक महिन्याचा झाल्यावर त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आठ-आठ दिवस शौचाला होत नसे. पण डॉक्टरांकडे उपचार सुरू होऊन अनेक औषधे आणि एनिमा देऊनही काहीच फरक पडत नव्हता.
मुलाचे पोट वातामुळे फुगलेले असायचे. त्यामुळे अखेर वैद्य कुटुंबाने डिसेंबर २०२४ मध्ये उपचारासाठी नाशिकहून मुंबईकडे धाव घेतली. त्यांनी बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विभोर बोरकर यांना दाखवले असता, त्यांनी बाळाला हिर्शस्प्रंगचा आजार असल्याचा संशय व्यक्त केला. बेरियम एनिमा, एंडोस्कोपी बायोप्सी आणि मॅनोमेट्रीसारख्या काही चाचण्यांमुळे त्याचे अचूक निदान झाले.
त्यानंतर बाळावर पीईआर-रेक्टल एंडोस्कोपिक मायोटोमी नावाची दुर्बिणीद्वारे प्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत या चिमुरड्याला घरी सोडण्यात आले. आता त्याला कधीच एनिमाची आवश्यकता भासणार नाही. तसेच यापुढे त्याला कोणत्याही वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासणार नाही. तो आता सामान्यपणे मलविसर्जन करतो, असे डॉ. विभोर बोरकर यांनी सांगितले.
अशी झाली शस्त्रक्रिया
बाळ उपचारासाठी आले त्यावेळी अत्यंत अस्वस्थ होते. त्याचे पोट सुजलेले आणि ते एनिमाशिवाय मल विसर्जन करू शकत नव्हते. निदानानंतर पीईआर-रेक्टल एंडोस्कोपिक मायोटोमी नावाच्या प्रगत एंडोस्कोपिक तंत्राचा वापर करून बाळावर यशस्वी उपचार करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे तीन तास चालली. भूलतज्ज्ञ डॉ. आदित्य प्रभुदेसाई आणि डॉ. धनश्री कारखानीस यांचे विशेष सहकार्य लाभले, असे इंटरव्हेंशनल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शंकर झंवर यांनी सांगितले.
हिर्शस्प्रंग आजार कसा होतो?
मोठ्या आतड्याच्या खालच्या भागात असलेल्या मज्जातंतू पेशी (गॅंग्लियन पेशी) विकसित न हिर्शस्प्रंग आजार होतो. यामध्ये मल साचून राहिल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. हिर्शस्प्रंग आजार हा पाच ते १० हजार मुलांमध्ये एकाला होतो. यामध्ये बाळाला होणाऱ्या संसर्गामुळे ते जीवघेणेदेखील ठरू शकते. लहान बाळांमध्ये पहिल्या हिरव्या रंगाच्या (मेकोनियम) मलास विलंब होणे हे सुरुवातीचे लक्षण आहे. मोठ्या मुलांना सहसा पोटाला सूज येणे, उलट्या होणे, वजन न वाढणे आणि सतत बद्धकोष्ठता तर, काहींना संसर्ग होऊ शकतो. ही स्थिती जन्मजात असली तरी, प्रसूतीपूर्व याचे निदान करणे अत्यंत अवघड असते.
दुर्बिणीद्वारे केली जाणारी पीईआर-रेक्टल प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्याने जन्मापासूनच त्रास सहन करणाऱ्या बाळासाठी हा एक उत्तम उपाय ठरला आहे. या शस्त्रक्रियेचे यश हे बालरोग उपचारांमधील एक उत्तम उदाहरण ठरले आहे. – डॉ. बिपिन चेवाले, सीईओ, ग्लेनईगल्स रुग्णालय