मुंबई : घरगुती वादातून वडिलांची हत्या करणाऱ्या ३१ वर्षीय तरूणाला वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) पोलिसांनी रविवारी अटक केली. तरुणाच्या आई – वडिलांचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने चाकूने वडिलांवर हल्ला केला. हत्येसाठी वापरलेला चाकू बीकेसी पोलिसांनी जप्त केला असून तरूणाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू मुंगोडा (६५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते बीकेसी येथील वाल्मिकी नगर परिसरात राहत होते. त्यांच्या हत्येप्रकरणी मुलगा नरसिंह राजू मुंगोडा (३१) याला बीकेसी पोलिसांनी अटक केली. राजू मुंगोडा यांची मुलगी प्रीती दुलगज (२३) यांच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी १०३ (१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला. तक्रारदार प्रीती या घरकाम करतात. त्या घरकाम करत असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तातडीने बीकेसी येथील वाल्मिकी नगर गाठले. त्यावेळी त्याचे वडील घराबाहेर पडले होते. त्यांच्या छातीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची जखम होती. त्यांचे कपडे रक्ताने माखले होते. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून राजू मुंगोडा यांना मृत घोषित केले.
चाकू हस्तगत
अटक आरोपी नरसिंह राजू मुंगोडा हा मृत व्यक्तीचा मुलगा आहे. राजू मुंगोडा यांचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यात नरसिंहने मध्यस्थी केली. त्यावेळी राजूने नरसिंहशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी संतापाच्या भरात त्याने राजू मुंगोडा यांच्या छातीत चाकू मारला. त्यात जखमी झालेल्या राजू यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर बीकेसी पोलिसांनी रविवारी वाल्मिकी नगर परिसरातून आरोपी नरसिंह मुंगोडा याला अटक केली. आरोपीने हत्येत वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे. तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
घरगुती वादातून हत्या
राजू मुंगोडा मद्यप्राशन करून घरी आला होता. त्याने पत्नीला मारहाण केली. त्यावेळी संतप्त झालेल्या नरसिंहने राजूवर चाकूने हल्ला केला. नरसिंह हाऊसकिपिंगची कामे करायचा. कुटुंबाचा उदरनिर्वाह तोच चालवित होता. राजू कोणताही कामधंदा करीत नव्हता. यापूर्वीही दारू पिऊन त्याने अनेक वेळा पत्नीला मारहाण केली होती. यावेळी आईला झालेली मारहाण सहन न झाल्यामुळे नरसिंहने घरातील चाकूने वडिलांवर हल्ला केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी दिली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस अधिक तपास करत आहेत.