मुंबई : लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर दगड फेकणाऱ्या एका आरोपीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. या आरोपीने गुरुवारी लोकलवर केलेल्या दगडफेकीत एक तरुणी जखमी झाली असून एका एक्स्प्रेसच्या काचा फुटल्या आहेत. वैष्णवी साळवी (२०) असे जखमी तरुणीचे नाव असून ती गुरुवारी सकाळी घाटकोपरहून ठाण्याच्या दिशेने जात होती. सकाळी ७.३० च्या सुमारास ही गाडी नाहूर रेल्वे स्थानक परिसरात पोहोचली होती. त्याच वेळी आरोपीने भिरकावलेला दगड महिला डब्यात उभ्या असलेल्या वैष्णवीच्या नाकाला लागला. यामुळे तिच्या नाकाला गंभीर दुखापत झाली.
हेही वाचा : मुंबई : अखेर म्हाडाला डीआरपीकडून ५०० कोटी परत मिळाले
याप्रकरणी तरुणीने कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही वेळाने अशाच प्रकारे लातूर एक्स्प्रेसवर दगड मारण्यात आला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र एक्स्प्रेसच्या एका खिडकीची काच फुटली. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला. विक्रोळीमधील पदपथावर राहणाऱ्या मोहन कदम (४५) याने लोकल आणि एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीला अटक केली.