लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: विवाहासाठी धर्मांतर केलेल्या प्रियकराने वांद्रे बॅंण्ड स्टॅण्ड येथे प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने प्रेयसीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तिचे डोके जमिनीवर आदळले आणि तिला गटारात बुडविण्याचाही प्रयत्न केला. पीडित महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोनगाव, कल्याण येथील रहिवासी असलेल्या लुबना जावेद सुकटे (२८) हिचे गेल्या अनेक वर्षांपासून खडकपाडा, कल्याण येथील आकाश मुखर्जी याच्याशी प्रेमसंबंध होते. बुधवारी गेटवे ऑफ इंडिया आणि गिरगाव चौपाटीवर फेरफटका मारल्यानंतर दोघेही संध्याकाळी वांद्रे बॅंण्ड स्टॅण्डवर पोहोचले. विवाह करण्यासाठी धर्मांतर करून आपण मुस्लीम झाल्याचे आकाशने बॅंण्ड स्टॅण्ड येथे पोहोचल्यावर लुबनाला सांगितले. धर्मांतर केल्याचे प्रमाणपत्र तिच्या मावशीला दाखवून लग्नाची परवानगी घेण्याची तयारीही त्याने दर्शविली. रात्री दहाच्या सुमारास लुबनाने त्याला घरी निघू असे सांगितले. त्यावेळी मुखर्जीचे वागणे पूर्णपणे बदलले आणि त्याने लुबनाला थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पण लुबनाने नकार दिला आणि घरी जाण्याचा हट्ट करीत ती रडू लागली. त्यानंतर मुखर्जीने तिचा गळा दाबला. लुबना ओरडू लागताच त्याने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.
तक्रारीनुसार त्याने पीडित मुलीचे केस ओढले व तिचे डोके जमिनीवर आदळले. त्यानंतर तिला गटारात बुडवण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर आसपासचे नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी लुबनाने आपल्याला झालेल्या मारहाणीबद्दल सांगितले. नागरिक जमा होताच आकाशने तेथून पळ काढला.
हेही वाचा… जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल; अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
तेथे जमलेल्या नागरिकांनी पोलिसांना बोलावले आणि लुबनाला रिक्षातून भाभा रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या डोळ्यांना आणि नाकाला झालेल्या जखमांतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आकाशला अटक केली असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.