मुंबईः बोरीवली पश्चिम येथे टेम्पोने रिक्षाला दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. घटनेनंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून याप्रकरणी बोरीवलीतील एम.एच.बी. कॉलनी पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने एम.एच.बी. कॉलनी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सुनील विश्वकर्मा असे मृत तरूणाचे नाव असून तो नालासोपारा पूर्व येथील रहिवासी आहे. सुनील व त्याचे वडील राजेंद्र विश्वकर्मा (५६) दोघेही सुतारकाम करतात. ते १३ मार्च रोजी सकाळी दोघेही बोरीवली पश्चिम मधील न्यू लिंकरोड येथील योगीनगर परिसरात आले होते. काम आटोपल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास ते घरी जाण्यासाठी निघाले. त्यासाठी त्यांनी बोरीवली परिसरातून शेअरिंग रिक्षा पकडली. काही अंतरावर रिक्षाच्या उजव्या बाजूला टेम्पोने जोरदार धडक दिली.
उजव्या बाजूला सुनील बसला असल्यामुळे त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्यामुळे त्याचे वडील राजेंद्र घाबरले. त्याचवेळी टेम्पो चालकाने अपघातानंतर तेथून पळ काढला. त्यानंतर सुनीलला सुरूवातीला कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढे अॅपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण सुनीलच्या प्रकृतीत सुधार न झाल्यामुळे अखेर १५ मार्चला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान गुरूवारी सुनीलचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा
सुनीलच्या मृत्यूनंतर शुक्रवारी त्याचे वडील राजेंद्र विश्वकर्मा यांनी टेम्पो चालकाविरोधात तक्रार केली. बोरीवली येथील एमएचबी पोलिसांनी राजेंंद्र यांचा जबाब नोंदवून याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३४(अ), १३४(ब), १८४, १०६, १२५(अ), १२५(ब) व २८१ अंतर्गत भरधाव वेगाने टेम्पो चालवून अपघातानंतर कोणतीही वैद्यकीय मदत न देता पलायन केल्याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. राजेंद्र यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर सुनीलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. या प्रकारामुळे घाबरल्यामुळे त्यांना टेम्पोचा क्रमांक नोंदवला आला नाही. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी टेम्पो चालकाला शोध घेत आहे. तसेच अपघातग्रस्त रिक्षा चालकाचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. सुनील हा त्याचे वडील व छोटी बहिणीसोबत नालासोपारा पूर्व येथील संतोष नगर परिसरात राहत होता.