मुंबई : कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता सैन्य दल आणि पोलीस दलात नोकरीला लावण्याच्या आमिष दाखवून अनेक तरुणांची २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी तरुणांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करूत तपास सुरू केला आहे. पनवेल परिसरात वास्तव्यास असलेल्या साईश डिंगणकर (२५) याला सैन्यात दलात नोकरी करण्याची इच्छा होती. ही बाब त्याने एका मित्राला सांगितली. मित्राने याबाबत चंद्र सेनापती या इसमासोबत त्याची ओळख करून दिली.
सेनापतीने आपली सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असल्याने कुठलीही परीक्षा न देता, सैन्य दलात नोकरी मिळवून देण्याचे आमिष साईशला दाखविले. त्यासाठी काही खर्च करावा लागेल असेही त्याने साईशला सांगितले. त्यानुसार २०२१ मध्ये साईशने आरोपीला १ लाख रुपये दिले. ही बाब त्याने अन्य मित्रांनाही सांगितली. त्यांनीही सेनापतीची भेट घेऊन त्याला २ ते ३ लाख रुपये दिले.
हेही वाचा…शासकीय महाविद्यालयात आयव्हीएफ केंद्र सुरू होणार
याचदरम्यान टाळेबंदी लागू झाली. टाळेबंदी संपल्यानंतर सर्वांच्या घरी नोकरीचे पत्र येईल. अशी माहिती आरोपींनी तरुणांना दिली. मात्र टाळेबंदी संपवून अनेक महिने उलटल्यानंतरही या तरुणांना कुठल्याही प्रकारचे पत्र आले नाही. याबाबत तरुणांनी सेनापतीबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.