मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. एकूण ३५ पदांपैकी केवळ १७ पदे भरली आहेत. तर २४ पैकी ११ विभाग कार्यालयांमध्ये सहायक आयुक्त नाहीत. या ११ विभाग कार्यालयांमधील रिक्त पदांचा अतिरिक्त कारभार कार्यकारी अभियंत्यावर सोपविण्यात आला आहे. या रिक्त पदाचा मुद्दा मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त पदासाठी निवड प्रक्रिया राबवली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून निवड प्रक्रियाच न झाल्यामुळे सहाय्यक आयुक्तांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांत सहाय्यक आयुक्तांच्या नियुक्ती केल्या जातात. त्याचबरोबर काही विभागांच्या प्रमुखपदीही सहाय्यक आयुक्त नियुक्त केले जातात. मुंबई महानगरपालिकेत अशी सहाय्यक आयुक्तांची एकूण ३५ पदे आहेत. त्यापैकी केवळ १७ पदांवर पूर्णवेळ अधिकारी आहेत. उर्वरित १८ पदांवर अभियंत्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त नसलेल्या अधिकाऱ्यांना निर्णय घेण्यास मर्यादा येतात.
हेही वाचा… प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इमारत बांधकामे ठप्प
हेही वाचा… राज्यात १० वर्षांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत दीड पटीने वाढ
११ विभाग कार्यालयांतील रिक्त असलेल्या सहाय्यक आयुक्तपदांचा अतिरिक्त कारभार कार्यकारी अभियंत्यांवर सोपविण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त हे प्रशासकीय पद आहे. त्यामुळे ही रिक्त पदे एमपीएससीच्या माध्यमातून त्वरित भरावी. तसेच ही पदे रिक्त असल्यामुळे अनेक कामे रखडलेली आहेत. ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी या पदांची भरती करावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात केली.