मुंबई : राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालॅण्ड विधानसभा निवडणुकीत सात उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या राज्यात अनेक वर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. त्याच वेळी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. यातून राज्यातील दोन महत्त्वाच्या पक्षांचे नागालॅण्ड विधानसभेत प्रतिनिधीत्व असेल.
नागालँण्ड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सात उमेदवार निवडून आले आहेत. यावरून नागालॅण्डमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे सष्ष्ट झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि पक्षाचे नागालॅण्डमधील प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी व्यक्त केली. पक्षाला सर्व समाज घटकांचा पाठिंबा मिळाला तसेच दुर्गम भागातील नागरिकांनी राष्ट्रवादीवर विश्वास व्यक्त केल्याचे वर्मा यांनी सांगितले.
६० सदस्यीय विधानसभेत एनडीपी आणि भाजपनंतर तिसऱ्या क्रमाकांचे पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. पहिल्या दोघांची युती असल्याने विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळेल, अशी माहिती वर्मा यांनी दिली. २००८ नंतर प्रथमच राष्ट्रवादीला नागालॅण्ड विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळाले आहे. तत्पूर्वी पक्षाचे दोन आमदार निवडून आले होते.
रिपब्लिकन पक्षाचे दोन जण विजयी
नागालॅंड विधानसभा निवडणुकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. मुंबईत आझाद मैदान येथील पक्षाच्या कार्यालयासमोर रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा अभूतपूर्व विजय जल्लोषात साजरा करण्यात आला. नागालँड विधानसभेच्या आठ जागा रिपब्लिकन पक्षाने लढविल्या होत्या. त्यापैकी टूएनसंद सदर विधानसभा मतदारसंघातून इम्तिचोबा व नोकसेन मतदारसंघातून वाय. लिमा ओनेन चँग हे दोन उमेदवार विजयी झाल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.