मुंबई : नवी मुंबईतील सिडको मुख्यालयाजवळील पारसिक हिल डोंगरावरील ५० हून अधिक मोठी झाडे तोडण्यात आली असून नॅटकनेक्ट फाउंडेशनने ही बाब उघडकीस आणली आहे. दरम्यान, याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी फाउंडेशनने केली आहे.

काही दिवसांपूर्वी सिडको मुख्यालयाजवळील पारसिक हिल डोंगरावरील झाडे तोडण्यात आल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या निदर्शनास आले. यामुळे परिसरातील पर्यावरणाचे वारंवार नुकसान होत असल्याचा आरोप फाउंडेशनने केला आहे. तसेच या वृक्षतोडीमुळे पावसाळ्यात भूस्खलन होण्याची शक्यता अधिक असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी नॅटकनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. याचबरोबर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडेही दाद मागण्यासाठी सल्लामसलत करण्यात येत आहे. पारसिक हिल डोंगरावरील झाडे तोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नॅटकनेक्ट फाउंडेशनने मागणी केली आहे.

राहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून नवी मुंबईला पसंती दिली जात आहे. त्यामुळे तेथील विकासही झपाट्याने होत असून महामुंबई उदयास येत आहे. असे असले तरी दुसरीकडे या शहरातील रहिवासी अतिबकालपणा, अशुद्ध हवा यामुळे त्रस्त होत आहेत. आता शहरातली वनसंपदा नष्ट करण्यात येत असेल तर, परिसरात शुद्ध हवा मिळणे कठीण होईल, अशी खंत सेव्ह बेलापूर हिल्स फोरमचे कपिल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. तसेच झाडे वाढण्यास किमान १० ते १२ वर्षे लागतात आणि काही तासांतच ती नष्ट होतात. खारफुटी आणि पाणथळ जागांचा नाश होतच आहे. मात्र, आता वृक्षतोडही होत असल्याने शहरासाठी हे अत्यंत धोकादायक असल्याचे खारघर हिल्स अँड वेटलँड्सच्या कार्यकर्त्या ज्योती नाडकर्णी म्हणाल्या.

यापूर्वी पायथ्याशी उत्खनन

काही महिन्यांपूर्वी पारसिक हिल डोंगरावरील हिरवाईत सिमेंटचे जंगल उभे राहत असताना आता डोंगर धोकादायक रित्या कापला जात असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला होता. डोंगराच्या पायथ्याला एका शैक्षणिक संस्थेला ४ हजार १३९ चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. शैक्षणिक संस्थेची इमारत उभी करण्यासाठी डोंगराचा काही भाग कापण्यात आल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला होता. तसेच याआधी सुशोभीकरणाच्या नावाखाली मधूनच टेकडी कापण्याचा प्रकार झाला होता. त्यावर पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला होता. तसेच याची दखल राज्य मानवाधिकार आयोगाने स्वत:हून घेतली आणि सिडकोला संबंधित विकासकावर कारवाई करावी लागली होती.

बांधकाम करताना निसर्गाचा ऱ्हास किती करणार याचा विचार करायला हवा. भविष्यात भूस्खलन सारखे धोके उद््भवू शकतात. २०२२ मध्ये पावसाळ्यात टेकडीवर दरड कोसळून पाणीपुरवठा देखरेख केंद्राचे नुकसान झाल्याची घटना घडली होती हे आपण कसे विसरू शकतो.

बी.एन.कुमार, पर्यावरणप्रेमी