मुंबई : नवी मुंबईच्या खाडीकिनाऱ्यावर प्रथमच ‘रायझोफोरा म्युक्रोनाटा’ या कांदळवन प्रजातीच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ही बाब शहराच्या जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, कांदळवन संवर्धनाच्या दृष्टीनेही हा एक सकारात्मक टप्पा आहे.
रायझोफोरा म्युक्रोनाटा ही खारट पाण्यात उगवणारी कांदळवन प्रजाती असून ती किनाऱ्याची धूप रोखण्यास मदत करते. ही वनस्पती मुळे जमिनीत खोलवर रोवते. किनारी परिसंस्थेतील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. पंतप्रधानांच्या मिष्टी (मॅन्ग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाइन हॅबिटॅट्स अँड टेन्जिबल इन्कम्स) उपक्रमांतर्गत जून २०२३ मध्ये वाशी रेल्वे स्थानकाजवळील कांदळवन पुनर्संचयित ठिकाणी रायझोफोरा म्युक्रोनाटाची सुमारे २ हजार ३०० रोपे लावण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पाहणी केली असता सर्व रोपे व्यवस्थित असल्याचे आणि लागवड यशस्वी झाल्याचे सांगितले. नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरात सामान्यतः ‘एव्हिसेनिया मरीना’ प्रजातींचे वर्चस्व आहे. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर रायझोफोरा म्युक्रोनाटा ही प्रजात आढळते. दरम्यान, काही वर्षांपूर्वी अर्ध्या हेक्टरचा तलाव तयार करण्यासाठी वाशी रेल्वे स्थानकाजवळील शेकडो कांदळवनाची झाडे तोडण्यात आली होती. परिक्षेत्र वन अधिकारी सुधीर मांजरे आणि त्यांच्या चमूने तेथे पुनर्संचयित केले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर कांदळवन विभागाने वाशी गाव खाडी किनारा परिसरातही सुमारे दहा एकर जागेत नव्याने कांदळवन क्षेत्र निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत. या भागात २५ मार्च पासून राडारोडा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात राडारोडा पडला होता. त्यामुळे बऱ्यापैकी कांदळवन नष्ट झाले होते. या ठिकाणी अनधिकृतपणे कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. याच ठिकाणी पुन्हा नव्याने कांदळवन उभे करण्यासाठी कांदळवन विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणीही ‘रायझोफोरा म्युक्रोनाटा’ आणि ‘तिवरे’ लावण्यात येणार आहे.
रायझोफोरा म्युक्रोनाटाची वैशिष्ट्ये
रायझोफोरा म्युक्रोनाटाची प्रमुख ओळख म्हणजे, पाण्याबाहेर आलेली वाकडी, जाळीसारखी मुळे. ही मुळे झाडाला आधार देतात आणि गाळात स्थिर करतात.
यामुळेच ती किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण करते.
गडद हिरवी व चकचकीत पाने टोकदार असतात. पानांद्वारे मीठ स्रवितं केलं जातं.
पर्यावरणीय महत्त्व
खारे पाणी, लाटांपासून आणि गाळ वाहून जाण्यापासून किनाऱ्याचे रक्षण करते.
मासे, खेकडे, पक्षी व अनेक सागरी जीव यांचे नैसर्गिक आश्रयस्थान.
खारफुटी प्रजाती हवेतला कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात त्यामुळे हवामान बदलाशी लढण्यासाठी फायदेशीर.
भौगोलिक क्षेत्र
ही प्रजाती मुख्यतः दक्षिण आशिया, दक्षिण-पूर्व आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या भागांत आढळते.
भारतात, विशेषतः पश्चिम किनारपट्टी, सुंदरबन, अंदमान, आणि आता नवी मुंबईत देखील तिची नोंद झाली आहे.