विनोद तावडे, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर या मंत्र्यांवर झालेल्या आरोपांमुळे आधीच भाजपची कोंडी झाली असतानाच कुलाबा मतदारसंघातील पक्षाचे ज्येष्ठ आमदार राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानांची कथित चित्रफितच समोर आल्याने भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांत तीन नेत्यांबद्दल वाद निर्माण झाल्याने सारवासारव करताना भाजपला डोईजड झाले आहे.
राज पुरोहित यांच्या स्टिंग ऑपरेशनमधून बरीच धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. मोदी, संघ, प्रमोद महाजन, मुख्यमंत्री फडणवीस, आमदार मंगलप्रभात लोढा या साऱ्यांबद्दल त्यांनी बरीच वादग्रस्त विधाने करून भाजपला अडचणीत आणले आहे. या सीडीची सत्यता तपासून, मगच पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पुरोहित यांच्या विरुद्ध कारवाईचे संकेत दिले. ज्येष्ठ असूनही मंत्रिपद नाकारल्याने पुरोहित पक्षावर संतप्त होते.  मेट्रो-३ प्रकल्पावरून त्यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. गिरगावमधील इमारती पाडण्यास आमदार पुरोहित यांनी विरोध केला होता.
भाजपमध्ये संशयकल्लोळ
तीन मंत्र्यांचे स्टिंग ऑपरेशनच्या सीडी आपल्याकडे आल्या असून, विधिमंडळाच्या अधिवेशनात त्या सादर करू, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केल्याने सत्ताधारी गोटात चितेंचे वातावरण आहे. आधीच तीन मंत्र्यांबद्दल वाद निर्माण झाल्याने आणखी कोणत्या मंत्र्यांची प्रकरणे बाहेर येतात याबद्दल पक्षातच दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली.
पुरोहित काय म्हणाले?
* पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कारभाराबद्दल व्यापारी वर्ग खुश नाही. मोदी सरकारच्या धोरणांमुळे भाजपला नेहमीच पाठिंबा देणारा व्यापारी वर्ग नाराज झाला आहे. सोने खरेदीकरिता पॅनकार्डची जबरदस्ती करण्यात आली. व्यापाऱ्यांनी त्यातूनही मार्ग काढला.  मोदी सरकारचे काय चालले आहे, अशी विचारणा हा वर्ग करू लागला आहे.
* विदेशातील व्यापाराबद्दल सरकारच्या धोरणात एकवाक्यता नाही. यासाठी १० वर्षांंची शिक्षा फारच आहे. सर्व गोष्टींमध्ये काळा धंदाच कसा दिसतो?
* खडसे यांच्यानंतर आपण पक्षात ज्येष्ठ असताना आपल्याला मंत्रिपदाकरिता डावलले गेले. मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या नावाला विरोध केला किंवा त्यांनीच आपली निवड रोखली. लोढा यांचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील वरिष्ठांची अत्यंत उत्तम संबंध आहेत. लोढा यांच्याकडे बराच पैसा आहे. निवडणुकीच्या काळात लोढा यांनी पक्षासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च केला. परिणामी पक्षात त्यांचे वजन वाढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लोढा यांचा प्रभाव दिसतो.
* लोढा आधी एकदम साधे बिल्डर होते. पण प्रमोद महाजन यांच्यामुळे त्यांची चांदी झाली. महाजन यांच्या मृत्यूनंतर हा पैसा लोढा यांनी स्वत:कडेच ठेवून घेतलेला दिसतो.
* आपण मुंडे गटाचे असल्यानेच मंत्रिपद नाकारण्यात आले. मुख्यमंत्र्यांबरोबर दररोज उठबस असते, पण ज्येष्ठ असूनही मंत्रिमंडळात समावेश केला जात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा