मुंबई : ठाण्यातील तीन हात नाका येथील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत तीन हात नाका येथे यू आकारचा एक उड्डाणपुल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार या पुलाच्या बांधकामासाठी नुकत्याच एमएमआरडीएने कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. तब्बल २३५ कोटी रुपये खर्च करत २४ महिन्यांच्या कालावधीत या पुलाची उभारणी करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. तेव्हा हा पुल पूर्ण होऊन वाहतूक सेवे दाखल झाल्यास तीन हात नाका येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावरील तीन हात चौक नाका हा महामार्ग आणि शहरातील अंतर्गत मार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ठाण्यातील विविध भागातील जवळपास नऊ रस्ते येऊन या ठिकाणी मिळतात. त्यामुळे साहजिकच तीन हात नाका येथे मोठी वाहतूक कोंडी होती. ही वाहतूक कोंडी वाहनचालक-प्रवाशांसाठी डोकेदुखी बनली आहे. ही बाब लक्षात घेता एमएमआरडीएने तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाअंतर्गत येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, कोणते रस्ते प्रकल्प राबवविता येतील याचा अभ्यास केला आहे. त्यानुसार आता तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाअंतर्गत तीन हात नाका येथे यू आकाराचा पुल उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

१.३ किमी लांबीच्या आणि २३५ कोटी रुपये खर्चाच्या या यु आकाराच्या पुलाचे डिझाईन तयार करण्यासह बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएकडून नुकतीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा शक्य तितक्या लवकर निविदा अंतिम करत पुलाच्या कामास सुरुवात करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. कामास सुरुवात झाल्यापासून २४ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण केले जाणार आहे.

तीन हात नाका चौक येथून मेट्रो४ मार्गिका जात आहे. तर एमएमआरडीएकडून आनंदनगर ते साकेत पूल उभारला जाणार आहे. अशावेळी तीन हात नाका येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नेमके काय करायचा असा मोठा प्रश्न एमएमआरडीएसमोर होता. हा प्रश्न अखेर एमएमआरडीएने यु आकाराच्या पुलाच्या माध्यमातून सोडवला आहे. तर आता हा प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने महत्त्वाचे पाऊल उचलत ठाणेकरांना मोठा दिलासा दिला आहे.