मुंबई : महायुती सरकारमध्ये भाजपने अन्य पक्षांममधून आलेल्यांना महत्त्वाची खाती देऊन त्यांचे महत्त्व वाढविले आहे. त्याच वेळी प्रस्थापित नेत्यांना आता दूर व्हा, असाच सूचक इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये भाजपने जुन्याजाणत्या नेत्यांचे महत्त्व कमी केले आहे. त्याच वेळी नवीन चेहऱ्यांना अधिक संधी दिली आहे. ते करताना अन्य पक्षांमधून आलेल्यांकडे महत्त्वाची खाती सोपविण्यात आली आहेत. ग्रामीण भागात पक्षाची पकड बसविण्यासाठी ग्रामविकास आणि पंचायत राज हे खाते अधिक महत्त्वाचे असते. ग्रामीण भागात २५:१५ या योजनेअंतर्गत निधी वाटपाचे अधिकार हे ग्रामविकास मंत्र्यांकडे असतात. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर या खात्याचे वर्चस्व असते. भाजपने हे खाते काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या जयकुमार गोरे यांच्याकडे सोपविले आहे. वास्तविक गोरे हे करोना काळातील गैरव्यवहारांवरून अडचणीत आले होते. उच्च न्यायालयाने त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. करोना काळात मृत झालेल्यांच्या नावे निधी हडप केल्याचा आरोप गोरे यांच्यावर विधानसभेत झाला होता. या गोरे यांच्याकडे भाजपने ग्रामविकास हे महत्त्वाचे खाते सोपविले.
हेही वाचा >>>पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना पुढील वर्षीही शाडूची माती मोफत देणार
सार्वजनिक बांधकाम हे अन्य महत्त्वाचे खाते भाजपने राष्ट्रवादीतून दाखल झालेल्या शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सोपविले. साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन चुलत्यांमध्ये पूर्वी विकोपाचा वाद होता. पण भाजपच्या श्रेष्ठींनी लक्ष घालत दोघांना एकत्र आणले. सातारा हा शरद पवार यांचा बालेकिल्ला होता. पण अलीकडे शरद पवारांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला. यातूनच भाजपने शिवेंद्रराजे यांना मंत्रिपदाची संधी देत पश्चिम महाराष्ट्र व विशेषत: मराठा समाजात संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीतून आलेल्या संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्याोग खाते सोपिवण्यात आले.
गणेश नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश करून त्यांच्याकडे वने हे खाते सोपविण्यात आल्याने भाजपमधील अनेकांचा त्याला आक्षेप आहे. नाईक यांच्या मुलाने भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून निवडणूक लढविली होती. तसेच नाईक यांच्या निकटवर्तीयांनी तेव्हा भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मुलाच्या बंडाला गणेश नाईकांची समंती होती हे लपून राहिलेले नाही, तरीही त्यांना मंत्रीपद देण्यात आल्याने भाजपच्या गोटात चलबिचल सुरू आहे.
● सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी नाकारण्यात आली. लोकसभा निवडणुकीत पराभव त्यांना भोवल्याचे बोलले जाते.
● गिरीश महाजन हे पक्षात संकटमोचकाची भूमिका बजावितात. त्यांच्याकडे जलसंपदा विभागाचे तीन विभाग सोपवून एक प्रकारे त्यांचे खच्चीकरण करण्यात आल्याचे मानले जाते. ग्रामविकास, जलसंपदा, वैद्याकीय शिक्षण, पर्यटन अशी खाती भूषविलेल्या महाजन यांच्याकडे जलसंपदा विभाग तोही विभागून देण्यात आल्याने त्यांची उपयुक्तता संपल्याचा संदेश पक्षाने दिला आहे.
● राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये दाखल झाल्यावर त्यांच्याकडे महसूल, गृहनिर्माण, पशूसंवर्धन अशी महत्त्वाची खाती सोपविण्यात आली होती. या वेळी विभागणी करण्यात आलेल्या जलसंपदा विभागातील दोन विभाग विखे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.
● लोकसभा व विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतरही पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असला तरी त्यांच्याकडे पर्यावरण व पशूसंवर्धन ही फारशी महत्त्वाची नसलेली खाती सोपवून त्यांनाही पक्षाने योग्य तो सूचक संदेश दिला आहे.
● प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा अपवाग वगळता पक्षातील अन्य नेत्यांच्या वाट्याला तेवढी ताकदीची किंवा महत्त्वाची खाती आलेली नाहीत.