मुंबई: विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींसाठी एक प्रकारे उत्सव आणि तंत्रज्ञानातील विविध आविष्कारांचा खजिना असलेल्या आयआयटी, मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे २७ वे पर्व सर्वांच्या भेटीस आले आहे. यंदा हा महोत्सव २७, २८ आणि २९ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला असून ‘टेकफेस्ट’अंतर्गतची व्याख्यानमालाही याच कालावधीत होणार आहे. पवई येथील आयआयटी, मुंबईच्या संकुलात व्याख्यानमालेअंतर्गत बुधवार, २७ डिसेंबर रोजी ‘इस्रो’चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ संवाद साधणार आहेत. डॉ. एस. सोमनाथ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’, अंतराळ क्षेत्र आणि भारताच्या अंतराळ मोहीमा आदी संबंधित गोष्टींची माहिती देण्यासह संवाद साधणार आहेत.
यंदाचा ‘टेकफेस्ट’ हा ‘गूढ क्षेत्र : जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते’ ( द मिस्टिकल रिल्म : व्हेअर इमॅजिनेशन मीट्स रिऍलिटी) या संकल्पनेवर आधारित आहे. डॉ. एस. सोमनाथ यांच्या व्याख्यानानंतर गुरुवार, २८ डिसेंबर रोजी रिलायन्स जिओचे अध्यक्ष व उद्योगपती आकाश अंबानी यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी युनायटेड नेशन्स इकोनॉमिक कमिशन फॉर युरोपचे माजी कार्यकारी सचिव ओगा अल्गेरोवा यांचे व्याख्यान होईल. तसेच विज्ञान, तंत्रज्ञान आदी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचीही व्याख्याने होणार आहेत.
हेही वाचा… सव्वा दोन कोटींच्या सोन्यासह विमानतळ कर्मचाऱ्याला अटक; सीमाशुल्क विभागाची कारवाई
शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना या व्याख्यानमालेस विनामूल्य उपस्थित राहता येणार आहे. व्याख्यानमालेची वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार असून श्रोते म्हणून सहभागी होण्यासाठी आणि इतर माहितीसाठी http://www.techfest.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच २६ ते २९ डिसेंबर २०२३ या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चेन आदी विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळांमध्ये आयआयटीचे प्राध्यापक आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी techfest.org/workshops या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन ‘टेकफेस्ट’ समितीतर्फे करण्यात आले आहे.