इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असून केंद्र सरकारने आपल्या विविध योजनांची माहिती शहरी भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहनारूढ जाहिराती करण्याचे ठरवले आहे. ‘हमारा संकल्प विकसित भारत’ या संकल्प यात्रेचे आयोजन करून पंतप्रधान स्वनिधी, उज्ज्वला, मुद्रा लोन, वंदे भारत ट्रेन, खेलो इंडिया अशा विविध १७ योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी वैशिष्टय़पूर्ण व्हॅन तयार करण्यात आल्या आहेत.ही वाहने देशभरातील ३१ राज्यांत विविध शहरांत उभी करण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्र आणि मुंबईत सर्वाधिक जागांवर ही वाहने उभी करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेच्या यंत्रणेला ४९८ जागा निश्चित करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी, लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी जाहिरात करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने संपूर्ण देशात वाहनारूढ जाहिरातींच्या माध्यमातून विविध ठिकाणी लोकवस्तीत जाऊन आपल्या योजनांचा प्रचार करण्याचे ठरवले आहे. देशभरात ३१ राज्यांत, ७० जिल्ह्यांत ही वाहने उभी केली जाणार आहेत. त्याकरिता राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी संस्था यांचीही मदत घेतली जाणार आहे. नागरिकांशी संवादही साधण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. तसेच योजनेतील लाभार्थ्यांचे अनुभव ऐकणे, ते पडताळून बघणे ही कामे या संकल्प यात्रेत केली जाणार आहेत. त्याकरिता शिबिरांचेही आयोजन स्थानिक स्वराज्य संस्थांनी करायचे आहे. त्याकरिता संबंधित विभागांचे अधिकारी यांच्याशी समन्वय करून त्यांनाही शिबिरात सहभागी करून घेतले जाणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई : मॅलेट बंदरातील मच्छिमार जेट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात, जहाजांची वाहतूक कोंडी सुटणार
महाराष्ट्राला सर्वाधिक लक्ष्य
केंद्र सरकारच्या जाहिराती असलेली ही वाहने उभी करण्यासाठी जागा शोधण्याचे सर्वाधिक लक्ष्य महाराष्ट्राला दिले आहे. राज्याला १७ वाहने देण्यात येतील. त्याखालोखाल उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. तर मोठय़ा शहरांचा विचार केला, तर मुंबईला सर्वाधिक जागांचे लक्ष्य दिले आहे. तसेच एकमेव मुंबई शहराला चार वाहने दिली आहेत. तर अन्य सर्व शहरांना, जिल्ह्यांना एकेक वाहन दिले आहे. सुमारे २५ हजार लोकसंख्येच्या वस्तीत ही बऱ्यापैकी मोठी जागा निवडायची आहे. मुंबई महापालिकेच्या २४ विभागांना जागा शोधण्याचे काम देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांवर जबाबदारी
देशभरात १५,४०० ठिकाणी ही वाहने उभी केली जाणार आहेत. त्याकरिता ४९०० स्थानिक स्वराज्य संस्थांना जागा निवडण्याचे काम देण्यात आले आहे. देशभरासाठी अशी १६० वाहने तयार करण्यात आली आहेत. ही वाहने दिवसभरात दोन ठिकाणी जातील असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच येत्या दोन महिन्यांत ही वाहने सर्व ठरलेल्या ठिकाणी पोहोचतील, असेही नियोजन केले जाणार आहे. त्याकरिता सरकारी अधिकाऱ्यांच्या समित्याही स्थापन केल्या जाणार आहेत.