मुंबई : मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे पंधरा दिवस शिल्लक असून मुंबईतील प्रमुख लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मुंबईतील एकूण सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटातच प्रमुख लढत होणार आहे. या लढतीसाठी ठाकरे गटाचे मशाल चिन्ह असून शिंदे गटाकडे धनुष्यबाण हे चिन्ह आहे. ठाकरे गटाला आपल्या चिन्हाचा प्रसार करण्याबरोबरच धनुष्यबाण हे चिन्ह आपले नाही हे देखील मतदारांच्या मनावर बिंबवावे लागते आहे.
चिन्हांचा हा संभ्रम दूर करणे हेच ठाकरे गटापुढचे मोठे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीअंतर्गत येत्या २० मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मुंबईतील एकूण सहा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघ असे आहेत जिथे शिवसेनेचे दोन गट आमनेसामने येणार आहेत. शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असून या निवडणुकीत या दोन्ही गटाची कसोटी लागणार आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवसेनेचे पारंपरिक चिन्ह धनुष्यबाण हे निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले होते. त्यानंतर अंधेरी पश्चिम विधानसभेसाठी एक पोटनिवडणूक पार पडली. माजी आमदार रमेश लटके यांच्या मतदारसंघासाठीच्या या निवडणुकीत ठाकरे गटाने मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवले. मात्र त्यानंतर ती निवडणूक बिनविरोध झाली होती. आता मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी ठाकरे गटाची मशाल या चिन्हाची खरी कसोटी आहे.
हेही वाचा – लाच घेतल्याच्या आरोपाखाली सहाय्यक संचलाकासह चौघांना अटक, सीबीआयची कारवाई
मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी वायव्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या तीन मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटात थेट लढत होणार आहे. त्यापैकी वायव्य मुंबईत ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर तर शिंदे गटाचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिंदे गटाकडून यामिनी जाधव आणि दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि शिंदे गटाकडून राहूल शेवाळे हे उमेदवार आहेत. या लढतीसाठी ठाकरे गटाकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मशाल चिन्ह हे पत्रके वाटून मतदारांशी संपर्क साधून पोहोचवले आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना चिन्हांचे गणित माहीत आहे. मात्र झोपडपट्टीसारख्या परिसरात, अमराठी भागात तसेच काही ठिकाणी उच्चभ्रू भागात मशाल आणि धनुष्यबाण यांच्या मागचे राजकारण मतदारांना समजावून सांगावे लागत असल्याचे कार्यकर्ते सांगतात. या संभ्रमाचा फटका ठाकरे गटाला बसणार का किंवा शिंदे गटाला याचा लाभ मिळणार का हे येत्या निवडणुकीच्या निकालातच समजू शकणार आहे.
दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. विधानसभेच्या निवडणुकीला वर्सोवा मतदारसंघात शिवसेनेच्या एकनिष्ठ उमेदवार राजूल पटेल या अपक्ष उभ्या राहिल्या होत्या. पंधरा दिवसात त्यांनी आपले रिक्षा हे चिन्ह घराघरात पोहोचवले व मोठ्या प्रमाणावर मते घेतली. त्यामुळे या संभ्रमाचा काहीही फटका बसणार नाही, असा विश्वास काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तर मुंबईत सगळे सुशिक्षित आहेत आणि बातम्यांमधून, समाजमाध्यमांवरून शिवसेनेच्या फुटीबाबत सगळ्यांना माहीत झाले आहे. त्यामुळे आम्ही फक्त मशाल या निशाणीबाबत बोलण्यावर भर देतो, अशी प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी दिली. या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या मतदारांमध्ये आणि अमराठी मतदारांमध्ये निवडणूक चिन्ह पोहोचवणे हे आणखी एक आव्हान आहे. कॉंग्रेसच्या मतदारांना हातावर शिक्का मारण्याची सवय आहे. त्यांना निवडणुकीचे गणित समजावून सांगणे आणि मशाल हे चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवणे ही कामगिरा सध्या पार पाडावी लागते आहे.
थेट लढती कोणत्या?
मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी वायव्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या तीन मतदार संघात शिवसेनेच्या दोन गटात थेट लढत होणार आहे. त्यापैकी वायव्य मुंबईत ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर तर शिंदे गटाचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिंदे गटाकडून यामिनी जाधव आणि दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि शिंदे गटाकडून राहूल शेवाळे हे उमेदवार आहेत.