मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये सत्ताधारी महायुतीचे उमेदवारी पिछाडीवर पडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, उदय सामंत, दिलीप वळसे-पाटील आदी मंत्र्यांच्या मतदारसंघांचा यात समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. महायुतीचे १७ उमेदवार निवडून आले तर सांगलीत अपक्ष विशाल पाटील निवडून आले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केल्यास काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या महाविकास आघाडीला १६०च्या आसपास मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे. महायुती १२५ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीचाच कल कायम राहिल आणि राज्यात सत्तांतर अटळ असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला होता. महायुती सरकारमधील ३० पैकी १२ मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवारी मागे पडले आहेत. अजित पवार आणि बारामती विधानसभा मतदारसंघ हे समीकरण असले तरी या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर ४७ हजार मतांची आघाडी घेतली आहे. अजित पवारांसाठी हा मोठा धक्का आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. चंद्रपूर मतदारसंघात वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत झाले. विशेष म्हणजे त्यांच्या स्वत:च्या बल्लारपूर मतदारसंघातही मुनगंटीवार हे ४८ हजार मतांनी पिछाडीवर राहिले आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार तब्बल ८० हजार मतांनी पिछाडीवर आहे.

प्रवेश पात्रता गुणांमध्ये ३ ते ४ टक्क्यांची घट

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ आपल्या भावासाठी मिळावा म्हणून शिंदे गटाचे नेते व उद्याोगमंत्री उदय सामंत हे आग्रही होते. पण हा मतदारसंघ भाजपने नारायण राणे यांच्यासाठी मिळविला. राणे लोकसभेवर निवडून आले असले तरी उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राणे हे १० हजार मतांनी पिछाडीवर राहिले आहेत. या निकालानंतरच राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी रत्नादगिरी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी केली आहे. रत्नागिरीतील पिछाडी ही उदय सामंत यांच्यासाठी तापदायक ठरणार आहे.

रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे हे औरंगाबाद मतदारसंघातून निवडून आले असले तरी विधानसभेत प्रतिनिधीत्व केलेला पैठण मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघाला जोडला आहे. पैठण मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे हे मागे पडले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये सत्ताधारी महायुतीचे उमेदवारी पिछाडीवर पडले आहेत.

या मंत्र्यांच्या मतदारसंघात फटका

उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, दिलीप वळसे-पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, सुरेश खाडे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, संदिपान भूमरे, अतुले सावे, धर्मरावबाबा आत्राम.