मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सचिव विभागात लिपिकांची ६८ पैकी तब्बल ५५ पदे रिक्त असून सध्यस्थितीत केवळ १३ लिपिक कार्यरत आहेत. अनेक वर्ष उलटल्यानंतरही महानगरपालिका प्रशासनाला लिपिक पदावरील भरतीसाठी मुहूर्त मिळालेला नाही. या विभागातील लिपिकांना बढती मिळाली असून विभागात पुरेसे लिपिक नसल्याने बढती मिळालेल्या अनेकांना लिपिक म्हणूनच काम करावे लागत आहे. तसेच, अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष धगधगत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या सचिव विभागात लिपिक पदाची भरती प्रक्रिया झालेली नाही. सचिव कार्यालयातील जवळपास ४९ लिपिकांनी पदोन्नतीसाठी २०२२ मध्ये परीक्षा दिली. त्या परीक्षेत एकूण ३१ लिपिक उत्तीर्ण झाले. विविध निकष आणि कौशल्याच्या आधारे त्यांची कनिष्ठ, वरिष्ठ सचिवीय सहाय्यक या पदावर पदोन्नती झाली. सचिव कार्यालयात लिपिक पदाची एकूण ६८ पदे आहेत. त्यापैकी तब्बल ५५ पदे रिक्त आहेत. कार्यालयातील ३१ लिपिकांना वरिष्ठ सचिवीय सहाय्यक, तर २४ लिपिकांना कनिष्ठ सचिवीय सहाय्यक या पदावर पदोन्नती मिळाली आहे. मात्र, कार्यालयात पुरेसे लिपिक उपलब्ध नसल्याने पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना कनिष्ठ पदावरील काम करावे लागत आहे.
आणखी वाचा-घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेची अटक कायदेशीरच उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
पदोन्नती मिळूनही पदभार हाती न आल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले आहे. तसेच, या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. पालिकेच्या सचिव विभागातील अनागोंदी कारभारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पालिकेत आता प्रशासकीय राजवट असल्यामुळे पालिकेतील विविध समितींच्या बैठका होत नाहीत. मात्र, पालिका निवडणुकीनंतर प्रशासकीय राजवट हटविण्यात आली, तर उपलब्ध लिपिकांवर कामाचा प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. तसेच, कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भातील प्रक्रिया सुरू असून आयुक्तांची परवानगी मिळताच तात्काळ बदली केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा-नवी मुंबईतील गृहखरेदी घोटाळा : मोनार्क युनिव्हर्सलच्या गोपाळ ठाकूर यांना साडेतीन वर्षांनंतर जामीन
शेवटची भरती २०१५ मध्ये
महानगरपालिकेच्या सचिव विभागात लिपिक पदासाठी शेवटची भरती २०१५ साली तत्कालीन महानगरपालिका सचिव नारायण पठाडे यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती. एकूण १२ जागांसाठी त्यावेळी जाहिरात काढण्यात आली होती. त्यावेळी कनिष्ठ सचिवीय सहाय्यक (मराठी) संवर्गात एकूण ३६ पदे होती. त्यापैकी एकूण २९ पदे रिक्त होती. दरम्यान, कनिष्ठ सचिवीय सहाय्यक संवर्गातील २९ रिक्त पदे लिपिक संवर्गात रूपांतरित करण्यात आली. त्यानंतर १२ व २९ अशी मिळून एकूण ४१ लिपिक पदे त्यावेळी भरण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत जवळपास ८ वर्षांचा कालावधी लोटला, तरीही लिपिक पदाची भरती प्रक्रिया झालेली नाही.