मनुष्यबळ अपुरे असल्याची सबब; अंक वेळेत जात नसल्याने वर्गणीदार गमावण्याची भिती
तुटपुंजे भांडवल, जाहिराती मिळविताना होणारी नाकीनऊ, छपाईचे वाढलेले दर अशा परिस्थितीतही मराठी नियतकालिकविश्वाची समृद्ध परंपरा जपत असलेल्या साप्ताहिके, पाक्षिके, मासिकांना आता वितरणातील गैरसोयींचाही फटका बसतो आहे. पोस्ट खात्याच्या ‘आस्ते चलो’ कारभारामुळे अनेक नियतकालिके आपले वर्गणीदार गमावण्याच्या स्थितीत असून यामुळे नियतकालिकांची परंपराच खंडित होते की काय अशी भीती संपादक-प्रकाशकांमध्ये आहे.
पोस्टामार्फत राज्याच्या दुर्गम भागातही कमी खर्चात अंक पाठविता येतात. परंतु, गेल्या वर्षभरापासून पोस्ट खात्याकडून नियतकालिके घरपोच पाठविण्यात सातत्याने दिरंगाई होत असल्याने प्रकाशक-संपादकांना वाचकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे,’ असे ‘आपले वाङ्मय वृत्त’ या मासिकाचे संपादक सतीश काळसेकर यांनी सांगितले.
पोस्टाने पाठविलेले अंक १५-२० दिवस ते कधी कधी महिनाभरही उशिरा पोहोचतात. तर कधी सलग तीन-चार अंक एकत्र घरपोच होतात. त्यामुळे वर्गणीदार नियतकालिकांच्या वितरण व्यवस्थेलाच दोष देत असून अंक वेळेवर पोहोचत नसल्याने वर्गणीदारांची संख्या कमी झाली असल्याचे प्रकाशक-संपादक सांगतात.
याबाबत काही प्रकाशकांनी पोस्टाकडे विचारणा केली असता पोस्टाकडे मनुष्यबळ कमी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे पोस्टाकडून रोजच्या बटवडय़ात नियतकालिकांचे काम लांबणीवर ठेवून महिन्यातून कधी तरी एकदा त्यांचे वितरण केले जात आहे. तसेच काही ठिकाणी अंकांवर तिकिटे लावण्याचे कामही नियतकालिकांच्या व्यवस्थापकांनाच सांगितले जाते. अंकांवरील नोंद क्रमांक, पानांची संख्या आगाऊ नाही कळवली आदी कारणे देत लहानसहान गोष्टींवरून अडवणुकीचे प्रसंग तर नित्याचेच झाले आहेत. तसेच ज्या नियतकालिकांनी पोस्टाकडे नोंदणी केली असेल त्यांना अंक पाठविण्यावर सवलत मिळते. परंतु, अशी नोंदणी केल्यानंतर पोस्टाने दिलेल्या ठरावीक तारखांनाच अंक त्यांच्याकडे पाठवावे लागतात. अंक न मिळालेल्यांना पुन्हा पोस्टाने किंवा कुरिअरने अंक पाठवावा लागतो. पोस्टावरच अंकांचे वितरण अवलंबून असल्याने हतबल झाले आहेत.

गेल्या वर्षभरात विशेषत: मागील सहा महिन्यांत पोस्टाच्या दिरंगाईचा फटका बसत आहे. अंक १५-२० दिवस विलंबाने पोहोचत आहेत. अंक विलंबाने पोहोचल्याच्या सुमारे १०० तक्रारी दर महिन्याला येत असतात. त्यातील तीस-चाळीस जणांना अंक मिळतच नाहीत. त्यामुळे त्यांना अंक पुन्हा पाठवावा लागतो.
– येशू पाटील, संपादक, मुक्त शब्द मासिक