मुंबई विद्यापीठाच्या परिसरातील विद्यार्थी भवनात विद्यार्थ्यांसाठी असणारी अभ्यासिका अपुरी पडत असून ती मोठी करण्यात यावी, अशी मागणी येथील विद्यार्थी करत आहेत. या अभ्यासिकेशेजारी एक मोठी खोलीदेखील उपलब्ध असून या खोलीचा येथील मुख्य उपाहारगृह चालकाने आपले सामान ठेवण्यासाठी वापर केला आहे. त्यामुळे विद्यार्थिहिताचा निर्णय घेण्याऐवजी विद्यापीठाने उपाहारगृह चालकाला खोली दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई विद्यापीठात अनेक विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला असून विद्यापीठ आवारातील ग्रंथालय व अभ्यासिकांचा वापर हे विद्यार्थी दररोज करतात. विद्यापीठातील ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याच्या चांगल्या सोयी असल्या तरी विद्यार्थी भवनातील विद्यार्थी व विद्यार्थिनी या दोहोंसाठी असलेल्या अभ्यासिकेत केवळ ३५ ते ४० जणांचीच आसनव्यवस्था आहे. ही आसनव्यवस्था वाढविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत, कारण विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या तासिकांचे वेळापत्रक हे वेगळे असल्याने अनेक विद्यार्थी येथे वेगवेगळ्या वेळांमध्ये येतात. मात्र, प्रत्येकालाच अभ्यासासाठी जागा मिळत नसल्याने अनेकांची पंचाईत होते. या अभ्यासिकेशेजारील एक खोली बंद असून ती अभ्यासिका म्हणून देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. मात्र, या खोलीचा वापर तळमजल्यावरील मुख्य उपाहारगृह चालक करत असल्याचे आढळून आले. याबाबत, विद्यापीठाचे उपकुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बनसोड यांना विचारले असता, ही खोली उपाहारगृह चालकाला देण्यात आलेली नसून तिचा नक्कीच अभ्यासिका म्हणून वापर करता येईल. याबाबत योग्य ती माहिती व स्पष्टीकरण देतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आवश्यकता असूनही विद्यार्थी भवनातील खोलीचा वापर उपाहारगृह चालक सामान ठेवण्यासाठी करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
मुलींच्या विशेष खोलीलाही टाळे
विद्यार्थी भवनात दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अभ्यासिकेसमोर मुलींसाठी असलेल्या विशेष खोलीलाही गेल्या अनेक दिवसांपासून टाळे असल्याचे आढळून आले. यामुळे अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे. ही खोलीही बंद असल्याबाबत बनसोड यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत अभियांत्रिकी व प्रशासन विभागाकडे पाठपुरावा सुरू असून ती खोली मुलींसाठी लवकरच खुली करण्यात येईल.

Story img Loader