मुंबई : प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसह रवींद्र नाट्य मंदिरच्या नूतनीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानासह उभ्या राहिलेल्या या नवीन वास्तूचे शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, स्थानिक लोकप्रतिनिधी, कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात संजय मोने, पुष्कर श्रोत्री, सुभाष नकाशे, नंदेश उमप, रोहन पाटील सादरीकरण करणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील नामांकित चित्रकार, सुलेखनकार आणि शिल्पकारांचे तळमजल्यावरील दालनात २८ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत विशेष प्रदर्शन भरणार आहे.

दरम्यान, रवींद्र नाट्य मंदिरच्या नूतनीकरणानंतर प्रथमच एक दिवसीय पु. ल. कला महोत्सवाचे शनिवार, १ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे. विविध भाषांमध्ये पु. ल. देशपांडे यांचे साहित्य प्रसारित व्हावे, या उद्देशाने सदर महोत्सवात ‘आमार देखा किचू नमुना’ हे नाटक बंगाली भाषेत सादर होणार आहे. पु. ल. देशपांडे यांच्या अतिशय लोकप्रिय ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील काही व्यक्तिरेखांवर आधारित हा नाट्याविष्कार रुपांगण फाउंडेशन सादर करणार आहे. तसेच या दिवशी मुंबईतील पार्थ थिएटर्सतर्फे पु. ल. देशपांडे लिखित ‘मॅड सखाराम’ या नाटकाचेही सादरीकरण होणार आहे.

लावणी आणि शास्त्रीय युगलगायन कार्यक्रमांची मेजवानी असणारा ‘महिला कला महोत्सव’ रवींद्र नाट्य मंदिर येथे रविवार, २ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. रेश्मा मुसळे परितेकर, योगिता मुसळे, अश्विनी मुसळे आणि समूह मिळून लावणी नृत्याचा आविष्कार सादर करणार आहेत. तसेच विदुषी अपूर्वा गोखले आणि विदुषी पल्लवी जोशी यांच्या शास्त्रीय युगलगायनाचा रसिक प्रेक्षकांना आस्वाद घेता येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून सर्वांनी रवींद्र नाट्य मंदिर लोकार्पण सोहळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना बहुसंख्येने हजर राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

Story img Loader