मुंबई : वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या मुख्यालयात अर्थात म्हाडा भवनात विविध कामांसाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक, म्हाडा रहिवाशी, विजेते, भाडेकरु येतात. म्हाडाच्या विविध विभागीय मंडळाशी आणि मंडळाशी संबंधित इतरत्र विभागांशीसंबंधित कामासाठी, टपाल, अर्ज, निवेदन, कागदपत्रे जमा करण्यासाठी म्हाडा भवनात विभागाचे कार्यालय शोधत फिरावे लागते. पण आता मात्र नागरिकांच्या, म्हाडा विजेत्यांच्या, भाडेकरुंचा म्हाडातील फेर्या बंद होणार आहेत. कारण आता त्यांना अर्ज, निवेदन, टपाल, इतर कागदपत्रांची स्वीकृती एकाच ठिकाणी होणार आहे. यासाठी बांधण्यात आलेल्या नागरी सुविधा केंद्राचे सोमवारी लोकार्पण झाले.

आता कोणत्याही कागदपत्रांची स्वीकृती एकाच ठिकाणी सुरु झाली आहे. त्याचवेळी म्हाडाच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर प्रवेशासाठी अभ्यांगताची गर्दी असते. आता अशी गर्दी होणार नसून कोणालाही रांगेत उभे राहण्याची गरज नाही. प्रवेश सोपा व्हावा यासाठी म्हाडाने अत्याधुनिक प्रवेश यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

२६२२ चौ. फुट जागेवर नागरी सुविधा केंद्र

म्हाडा मुख्यालयातील आवारात २६२२ चौ. फुट जागेवर नागरी सुविधा केंद्र बांधण्यात आले आहे. या नागरी सुविधा केंद्रात ३७० चौ.फुटाची प्रतिक्षालय, २२० चौ. फुटाची लाॅबीचा समावेश आहे. तर या केंद्रा पिण्याच्या पाण्याच्या सोयीसह शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर १८ काऊंटर येथे असणार असून त्या त्या विभागाशी संबंधित निवेदन पत्र, टपाल, माहिती अधिकारीखालील अर्ज वा इतर कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जमा करता येणार आहेत.

संपूर्णत वातानुकूलित अशा या केंद्रात कार्यालयीन वेळेत म्हाडाच्या अधिकारी-कर्मचार्यांसह कंत्राटी कर्मचारी असणार आहेत. हे कर्मचारी नागरिकांना आवश्यक ती माहिती ही पुरविणार आहेत. त्याचवेळी आपल्या अर्जाचे, निवेदनाचे पुढे काय झाले याची माहितीही नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे म्हाडा भवनातील फेऱ्या बंद होणार आहेत. त्याचवेळी म्हाडा उपाध्यक्ष, विविध मंडळाचे मुख्य अधिकारी, निवासी अभियंत्यांसह इतर कोणत्याही अधिकार्यांना भेटण्यासाठीही अनेक नागरिक दररोज म्हाडात येतात. अनेकदा अधिकारी नसल्याने वा त्यांची वेळ घेत न आल्याने नागरिकांची गैरसोय होते. अधिकारी भेटत नाहीत. पण आता यापुढे अधिकाऱ्यांना भेटणेही सोपे होणार आहे. कारण आता अधिकाऱ्यांची वेळ घेण्यासाठी डीजी अॅप सुरु केला आहे. या अॅपचेही लोकार्पण म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते झाले.

डीजी अॅप कार्यान्वित

डीजी अॅपमध्ये जाऊन आपल्या डीजी लाॅकरमधील आधारकार्ड जोडून नोंदणी करावी लागेल. म्हाडात कोणत्याही कामासाठी येणाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारावर नोंदणी केल्यानंतर फेस रिंडीग करत म्हाडा मुख्यालयात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे आता मुख्य प्रवेशद्वाराबाहेर नागरिकांची रांग दिसणार आहे. त्याचवेळी अधिकार्यांची वेळ घेण्यासाठी डीजी लाॅकरमध्ये नोंदणी करून संबंधित अधिकाऱ्यांची वेळ घेऊन त्या वेळेत येऊन अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांना भेटणेही सोपे होणार आहे.