मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी पूर्व भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेचे आता नवीन विभाग कार्यालय सुरू झाले आहे. पालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयाच्या विभाजनाला अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुहूर्त मिळाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी या नव्या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे जोगेश्वरी, अंधेरी पश्चिममधील सुमारे चार लाख नागरिकांना पालिकेच्या विविध सेवा घराजवळ मिळू शकणार आहेत. आता पालिकेच्या विभाग कार्यालयांची संख्या २६ झाली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम उपनगरांतील लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली असून वाढती लोकसंख्या आणि मोठ्या क्षेत्रफळासाठी येथील विभाग कार्यालये आता अपुरी पडू लागली आहेत. त्यामुळे पालिकेने काही विभाग कार्यालयांचे विभाजन करण्याचे ठरवले होते. गेल्यावर्षी मालाडमधील विभाग कार्यालयाचे विभाजन पार पडले. मात्र विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी पूर्व भाग असलेल्या के पूर्व विभाग कार्यालयाचे विभाजन गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या विभाजनाला मुहूर्त मिळाला असून के उत्तर हे नवीन विभाग तयार करण्यात आला आहे. या नव्या विभाग कार्यालयाचे शुक्रवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जोगेश्वरी (पूर्व) येथील पूनम नगर परिसरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मजास मंडईमधील दहा मजली इमारतीत हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>समुपदेशनामुळे मुलीवर झालेला अत्याचार उघडकीस; मावशीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

के उत्तर इमारतीच्या कोनशीलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार रवींद्र वायकर, सहायक आयुक्त (के पूर्व) मनीष वळंजू उपस्थित होते. प्रशासकीय विभाग पुनर्रचनेतून नव्याने तयार केलेल्या के उत्तर प्रशासकीय विभागातर्फे संपूर्ण क्षमतेने आणि सर्व प्रकारच्या नागरी सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. विभाग कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये भर पडणार आहे. यामुळे नागरिकांना आपल्या नजीकच्या परिसरात सेवा – सुविधा प्राप्त करणे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक घराजवळ विभाग कार्यालय उपलब्ध करण्याची मागणी करीत होते. नव्या विभाग कार्यालयामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या १७ प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा या कार्यालयाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत, असे खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट, दादरमध्ये पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात

२६ वे कार्यालय

के उत्तर प्रशासकीय विभागाच्या समावेशामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विभागांची संख्या २६ पर्यंत पोहचली आहे. के उत्तरअंतर्गत महानगरपालिकेच्या एकूण आठ प्रभागांचा समावेश आहे. एकूण ८.५० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या क्षेत्रात हा विभाग विस्तारलेला आहे. अंदाजे चार लाखांहून अधिक लोकसंख्येचा समावेश या विभागामध्ये आहे. शाम नगर तलाव, मेघवाडी, सर्वोदय नगर, शेर – ए – पंजाब वसाहत, जलाशय, जोगेश्वरी गुंफा, महाकाली गुंफा, जोगेश्वरी रेल्वे स्थानक पूर्व परिसराचा समावेश या प्रशासकीय विभागामध्ये आहे. या दहा मजली इमारतीमध्ये तळमजल्यावर नागरी सुविधा केंद्र उपलब्ध असेल. तसेच तिसरा, चौथा आणि पाचवा मजल्यावर के उत्तर विभागाचे कार्यालय असणार आहे.

के उत्तर विभाग

क्षेत्रफळ – ८.५० चौरस किलोमीटर

लोकसंख्या – ४.२५ लाख

प्रभाग संख्या – ८

विभागातील महत्त्वाची ठिकाणे

जोगेश्वरी गुंफा

महाकाली गुंफा

लोकमान्य टिळक शामनगर तलाव

मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान