लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : आफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापाची लागण होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या नियमानुसार पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक असते. महाराष्ट्रातूनही आफ्रिकन देशांमध्ये जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. हेच जाणून विलेपार्लेमधील जुहू येथील मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये पिवळ्या तापाच्या (पिवळा ज्वर) लसीकरण केंद्राचे सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मुंबई विमानतळाचे आरोग्य अधिकारी डॉ. अच्छेलाल पासी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने या लसीकरण केंद्रासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्या दिल्या आहेत. कूपर रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागाअंतर्गत सदर लसीकरण केंद्र कार्यान्वित असेल. दर आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत या केंद्रात लस उपलब्ध असेल. त्यासाठी प्रत्येकी ३०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. लसीकरणासाठी येताना नागरिकांना त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) आणणे बंधनकारक आहे, अशी माहिती कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रूग्णालयामध्ये यापूर्वीच पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आता कूपर रुग्णालयामध्ये देखील पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. परिणामी पश्चिम उपनगरातील रहिवाशांना विशेष फायदा होईल, असेही डॉ. मोहिते यांनी सांगितले.
आणखी वाचा-भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृह उभारावे, खासदार राहुल शेवाळे यांची मागणी
दरम्यान, कूपर रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र केंभवी म्हणाले की, ‘आफ्रिकन देशांमध्ये ‘पिवळा ताप’ हा गंभीर आजार मोठ्या प्रमाणावर आढळतो. या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या इतर नागरिकांनाही पिवळ्या तापाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आफ्रिकन देशात जाणाऱ्या प्रत्येक विदेशी पर्यटकाला या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस देणे अत्यावश्यक आहे. या लसीमुळे संबंधित पर्यटक आफ्रिकन देशातून आपल्या देशात परतल्यानंतर त्याच्या मूळ देशात हा आजार पसरत नाही. जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषानुसार व पिवळ्या तापाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक प्रवाशाला आफ्रिकन देशात जाण्यापूर्वी पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस द्यावी लागते. ही लस घेतल्याचे अधिकृत प्रमाणपत्र संबंधित प्रवाशाने जोडल्याशिवाय त्या प्रवाशाला त्या देशात जाण्याचा व्हिजाही मिळत नाही’.