मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्यातील आठ नवीन महाविद्यालयांना परवानगी दिल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या ८०० जागा वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांंच्या जागांची संख्या ४ हजार ८५० वर पोहोचली आहे. या नवीन महाविद्यालयांतील जागा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या समुपदेशन फेरीमध्ये समाविष्ट होणार असल्याचे संकेत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिले आहेत. त्यामुळे तिसऱ्या समुपदेशन फेरीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या समुपदेशन फेरीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील अंबरनाथ, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, जालना हिंगोली, बुलढाणा आणि भंडारा येथे प्रत्येकी १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या आठही महाविद्यालयांनी परवानगी मिळताच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांना तातडीने संलग्नता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठही महाविद्यालयांमधील ८०० जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या समुपदेशन फेरीमध्ये या जागांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे नियोजन करावे, अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात आली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची तिसरी समुपदेशन फेरी ९ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता होती. मात्र दुसऱ्या समुपदेशन फेरीची प्रवेश प्रक्रिया दोन दिवसांनी वाढविण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतरच फेरी राबविण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सांगण्यात आले.
दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या समुपदेशन फेरीला २६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी ३० सप्टेंबर रोजी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव गुणवत्ता यादी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यानंतर जाहीर करण्यात आली. गुणवत्ता यादीमध्ये नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात ४ ऑक्टोबरपर्यंत जाऊन प्रवेश घ्यावा लागणार होता. मात्र आता ही मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. यादरम्यान येणाऱ्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.