गेल्या काही दिवसांपासून प्राप्तीकर विभाग अर्थात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींवर धाडी टाकल्याचं दिसून आलं आहे. या व्यक्तींमध्ये राजकीय क्षेत्रातील काही दिग्गज नेतेमंडळींचाही समावेश होता. तसेच, काही व्यावसायिकांचाही समावेश होता. आता प्राप्तीकर विभागानं आपली नजर बॉलिवूडकडे वळवली असून बुधवारी दोन प्रसिद्ध निर्मात्यांवर विभागाकडून धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये निर्माते जयंतीलाल गाडा आणि विनोद भानुशाली यांचा समावेश आहे.
प्राप्तीकर विभागाच्या मुंबईतील तपास विभागानं (Investigation Wing) बुधवारी सकाळीच बॉलिवूडमधील या दोन प्रसिद्ध निर्मात्यांवर धाड टाकली. जयंतीलाल गाडा यांचं घर आणि त्यांची प्रोडक्शन कंपनी असणाऱ्या पेन स्टुडिओजच्या कार्यालयाची प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. हे काम बुधवारी दिवसभर चालू होतं. रात्री उशीरा धाड संपली आणि प्राप्तीकर विभागाचे कर्मचारी त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले.
दुसरीकडे त्याचवेळी निर्माते विनोद भानुशाली यांच्यावरही प्राप्तीकर विभागानं धाड टाकली. विनोद भानुशाली हे अगदी काही काळापूर्वीपर्यंत देशातल्या अग्रणी म्युझिक कंपनीशी संलग्न होते. नुकतंच त्यांनी स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं होतं. या दोघांच्याही कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्तीकर चुकवल्याचा आरोप असून त्यासंदर्भात विभागाकडून हा छापा टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
जयंतीलाल गाडा ‘गंगुबाई काठियावाड’चे सहनिर्माते!
जयंतीलाल गाडा आणि त्यांच्या प्रोडक्शन हाऊसकडे अनेक मोठ्या बॅनर्सचे चित्रपट असतात. तसेत, त्यांच्याकडे काही गाजलेल्या मालिकांचेही हक्क असल्याचं सांगितलं जात आहे. तयांची पेन स्टुडिओ ही कंपनी ऑस्कर पुरस्कारांमध्ये भारताचं नाव गाजवणाऱ्या ‘RRR’ या चित्रपटाची प्रेझेंटरही आहे. आलिया भटच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे ते सहनिर्मातेदेखील आहेत. याव्यतिरिक्त विनोद भानुशाली यांनी त्यांच्या ‘भानुशाली फिल्म्स’ या बॅनरखाली काही चित्रपटांची निर्मिती केली आहे.