मुंबई : मुंबईमध्ये रस्ते कॉंक्रीटीकरणाची पहिल्या टप्प्यातील अर्धवट राहिलेली कामे १ ऑक्टोबरपासून तातडीने सुरू करावीत व ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्याचवेळी दर्जा, गुणवत्ता यांच्याशी कदापि तडजोड केली जाणार नाही, याची दक्षता घ्या असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर उपस्थित राहून दैनंदिन कामाचा आढावा घ्यावा. गतीने काम पूर्ण करावे, असे निर्देश देखील बांगर यांनी दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत जानेवारी २०२३ मध्ये पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांसाठी कार्यादेश देण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार असून या कामांना ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण ७०१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरपासून या सर्व कामांना वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका मुख्यालयात रस्ते व वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम यांच्यासह संबंधित अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
हेही वाचा >>> Mumbai Crime : लिव्ह इन पार्टनरवर बलात्कार केल्याचा आरोप, सात अटींचा करार दाखवून मिळवला जामीन, मुंबईतली घटना
सिमेंट काँक्रीट रस्ते बनवण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन रस्ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणतः ३० – ४५ दिवसांचा कालावधी जातो. दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील काँक्रीटीकरण रस्त्यांची यादी तयार करावी. प्रत्येक महिन्यांचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करावे. त्याचा सुयोग्य पाठपुरावा करावा. रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. जो रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे तो रस्ता प्राधान्याने पूर्ण करावा. अपूर्ण अवस्थेतील रस्ते पूर्ण करूनच नवीन काम हाती घ्यावे. कंत्राटदारांनी एका वेळी अधिक ठिकाणी कामे हाती घेऊन ती वेगाने पूर्णत्वास न्यावीत. वाहतूक पोलिसांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करून घेण्याकामी महानगरपालिका समन्वय राखेल, असे यावेळी बांगर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> गणेशोत्सवात यंत्रणांनी सजग राहावे; पालिका आयुक्तांचे संबंधितांना आदेश
तयार झालेला रास्ता पुन्हा पुन्हा खोदण्याची वेळ येऊ नये
तयार झालेला रस्ता पुन्हा खोदण्याची वेळ येऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या जलअभियंता विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, मलनिःसारण प्रकल्प आदी विविध विभागांशी समन्वय ठेऊन रस्ते कामे पूर्ण करावी. त्याचबरोबर विद्युत कंपन्या, गॅस वितरण कंपन्या, दूरध्वनी कंपन्या यांच्याशी संपर्क साधून, महानगरपालिकेने रस्ते विकासाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याची माहिती त्यांना द्यावी. त्यांची या रस्त्यावर काही कामे असतील ती आणि रस्ते विकासाची कामे यांचा सुयोग्य मेळ घालूनच करावीत, असेही निर्देश बांगर यांनी दिले.
आयआयटी मुंबईशी करार
सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये काँक्रिट प्लांटपासून ते काँक्रिट रस्त्यावर क्युरिंग करण्यापर्यंतच्या कामाचा समावेश असेल. येत्या आठवड्याभरात महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात सामंजस्य करार केला जाईल, असे देखील बांगर यांनी नमूद केले.